शिक्षकांच्या मुळावर शिक्षणमंत्री

0

शिक्षण क्षेत्रात आज शिक्षकांची फारच दुरवस्था झाली आहे. शिक्षण क्षेत्रात काँग्रेसवाल्यांच्या संस्था असल्याचे सांगत फुले, शाहू, आंबेडकर, गांधी, साने गुरुजी आणि यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांच्या संस्था मोडून काढण्याचा सरकारचा डाव आहे. ‘आपल्या’ संस्था आहेत किती? असे ‘नागपूर’च्या बैठकीत शिक्षणमंत्र्यांनी सांगून राज्यात कर्मवीर भाऊराव पाटील, पंजाबराव देशमुख, डॉ. साळुंखे आणि पुरोगामी विचाराच्या कार्यकर्त्यांनी स्थापन केलेल्या संस्था खिळखिळ्या करण्याला मान्यता मिळवली आहे. भाषा, गणित, विज्ञान या विषयांचे हजारो शिक्षक अतिरिक्त करायचे, कला, क्रीडा, संगीत शिक्षक संपुष्टात आणायचे. असे संचमान्यतेचे निकष बदलून प्रथमच होत आहे, असा घणाघात विधान परिषदेत आमदार कपिल पाटलांनी केला होता. मुंबई हायकोर्टाने सुमोटो आदेश दिल्यानंतर बंदी काळात नेमण्यात आलेल्या शिक्षकांच्या मान्यता रोखण्यात आल्या आहेत. अनुकंपावरील शिक्षक/शिक्षकेतर कर्मचार्‍यांना मान्यता का देण्यात येत नाही? इंग्रजी, गणित आणि समाजशास्त्र विषयाला ऑप्शनला टाकण्याचा विचार शिक्षणमंत्री कसे करू शकतात? हे विषय शिकवले नाहीत तर गोरगरीब व बहुजन वर्गाचे प्रचंड नुकसान होईल. असे अनेक प्रश्‍न त्यांनी विधीमंडळात उपस्थित केले होते. मात्र, हे करताना त्यांनी मागासवर्गीय आणि विकलांग मुलांना शिक्षण प्रवाहातून संपुष्टात आणण्याचा, 5वीपर्यंत इंग्रजी न शिकवण्याचा शिक्षणमंत्र्यांचा प्रस्ताव माननीय मुख्यमंत्र्यांनी स्क्रॅप केला हे एक मुख्यमंत्री महोदयांनी चांगले केले, असे म्हणायलाही ते विसरले नव्हते. शिक्षकांच्या प्रश्‍नावर आवाज उठवण्यासाठी आता मोजकी मंडळी उरली आहेत. त्यापैकी पाटील हे एक आहेत. नुकताच सरकारने शिक्षकांचा पगार जिल्हा बँकेत जमा करण्याचा निर्णय घेतला त्यामुळे ते चांगलेच तडकले आहेत. त्यांनी शिक्षणमंत्र्यांना एक खरमरीत पत्रच लिहून टाकले आहे.

मुंबईतील शिक्षक-शिक्षकेतरांचे पगार युनियन बँक ऑफ इंडियाकडून मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेकडे वर्ग करण्याचा आपला शासन निर्णय धक्कादायक आहे. राज्यातील अनेक जिल्हा बँका अडचणीत आहेत. काही जिल्हा बँका तर बुडाल्या. शिक्षकांचे पगार सहा-सहा महिने अडकले. त्यातली डिपॉझिट्स अजूनही परत मिळालेली नाहीत. मुंबईपाठोपाठ त्या जिल्ह्यातील शिक्षक-शिक्षकेतरांचे पगारही राष्ट्रीयीकृत बँकेकडे वर्ग करण्यात आले तेव्हा कुठे दिलासा मिळाला. नाशिकची जिल्हा बँकही अशीच अडचणीत आहे आणि शिक्षक-शिक्षकेतरांचे पगार झालेले नाहीत. सहकारी बँकांमधील घोटाळे आणि भ्रष्टाचार यांची चर्चा गेली अनेक वर्षे आपण ऐकतो आहोत. स्वतः देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि वित्तमंत्री अरुण जेटली यांनी सक्त पावले उचलेली आहेत. मोदी, जेटलींच्या राष्ट्रीयीकृत बँकेवर तावडे साहेब तुमचा विश्‍वास दिसत नाही? मुुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेकडे पगार सोपवण्यामागचा तुमचा हेतू काय आहे? 50 वर्षांत कधी पगार वेळेवर झाले नव्हते. ते गेली सहा वर्षे सुरळीत सुरू असताना हा घाशीरामी निर्णय घेण्याचे कारण काय? माझे आई-वडील शिक्षक होते. दिवाळीतसुद्धा पगार वेळेवर मिळत नसे. तेव्हा पगारही जास्त नव्हता. त्यामुळे आमदार झाल्यानंतर विधान परिषदेच्या सभागृहात मी पहिला प्रश्‍न शिक्षकांच्या पगाराचाच विचारला होता, असे पोटतिडकीने त्यांनी म्हटले आहे. 4 वर्षांच्या संघर्षांनंतर युनियन बँक ऑफ इंडियाकडे पगार आले आणि मुंबईचे शिक्षक सुखावले. घाशीराम कोतवालाने जसा पुणेकरांचा छळ मांडला होता अगदी तसाच तुमचा हा निर्णय आहे. तुम्ही शिक्षकांना का छळू मागत आहात? कोणता राग शिक्षकांवर काढू मागत आहात? हेच कळत नाही.

काळी संचमान्यता आणून राज्यातल्या सगळ्या शाळांची व्यवस्था आधीच आपण बिघडवून टाकली आहे. त्यामुळे अतिरिक्त झालेल्या शिक्षकांचे समायोजन अजून झालेले नाही. कला, क्रीडा या विषयांचे शिक्षण संपवून टाकले आहे. पीटी आणि आर्ट टीचर यांना 50 रुपये रोजावर ठेवून तुम्ही शोषण करु मागता आहात. 2 मे 2012 नंतर मा. हायकोर्टाच्या आदेशाने नियुक्त झालेले शिक्षक आणि वाढीव तुकड्यांवरचे शिक्षक यांचा तर तुम्ही छळ मांडला आहे. आठवड्याच्या 45 तासिका करुन तुम्ही आता शिक्षकांना रक्त ओकायला लावणार आहात. कॅशलेस शिक्षक कुटुंब आरोग्य योजनेचा पाठपुरावा मी तीन वर्षे करतो आहे.

तयार केलेली योजना तत्कालीन शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनी मान्य केली होती. तुम्ही ती अजून अडकवून ठेवली आहे. तुमच्या 17 मे 2017 च्या घाशीरामी कोतवाली जीआरने रात्रशाळांमधल्या 1,010 अनुभवी व तज्ज्ञ शिक्षकांच्या सेवा समाप्त केल्या आहेत. रात्रशाळा आम्हाला बंद करायच्या असल्याचे तुमचे शिक्षण सचिव नंदकुमार उघडपणे बोलत आहेत. मुंबईतील शिक्षक-शिक्षकेतरांचे गेली सहा वर्षे नियमित सुरु असलेले पगार तुम्हाला पहावत नाहीत. एका फटक्यात तुम्ही सगळे हे पगार शासकीय धोरणाच्या विरोधात जाऊन मुुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेत ढकलण्याचे कारण काय होते? मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँक अडचणीत आहे, असे तुम्हीच जीआरमध्ये कबूल केले आह आणि ती वाचवण्यासाठी युनियन बँक ऑफ इंडियाचा निर्णय रद्द करत असल्याचे तुम्हीच जीआरमध्ये म्हटले आहे. इतके निर्लज्ज समर्थन खुद्द जीआरमध्येच केले जाण्याची ही पहिलीच वेळ असावी.

का छळता आहात तुम्ही शिक्षकांना? का महाराष्ट्राची शिक्षण व्यवस्था मोडून काढता आहात? सहकारी बँक वाचवण्यासाठी फक्त आम्हा शिक्षकांचा बळी का देत आहात? मुंबईतल्या सगळ्याच सरकारी, निमसरकारी कर्मचार्‍यांचे पगार राष्ट्रीयीकृत बँकेत सुरक्षित ठेवणार आणि आमच्या गरीब शिक्षकांना मात्र डेंजर झोनमध्ये ढकलणार, हा कोणता न्याय? नाना फडणवीसांच्या मुत्सद्देगिरीचे मराठी माणसाला आजही कौतुक आहे. पण घाशीराम कोतवाल हा काही अभिमानाचा विषय नाही. छत्रपती शिवराय आणि छत्रपती शाहू महाराज यांचा आदर्श घेण्याऐवजी आपण कोतवाली का करता आहात? अजूनही वेळ गेलेली नाही. हे सगळे चुकीचे निर्णय ताबडतोब मागे घ्या. एवढीच विनंती. शिक्षकांच्या प्रश्‍नावर त्यांनी मांडलेली पोटतिडीक लक्षात घेण्याजोगी आहे. तरीही शिक्षकांच्या प्रश्‍नाबरोबर शिक्षणाचे प्रश्‍नही मत्वाचे आहे. आजच्या स्पर्धेच्या युगात मेरीटसाठी विग्यार्थी आणि पालक यांची जीवघेण्या स्पर्धेतील उडी आणि त्यामुळे खासगी ट्युशनक्लासेसचे फुटलेले पेव याला पायबंद कोण घालणार? मुल्यशिक्षणासाठी आणि कौशल्य शिक्षणासाठी सुरू असलेला आपला लढा कोठे गेला. शिक्षक त्याची बांधिलकी जपतात का? हाही प्रश्‍न अनुत्तरित राहतो. शिक्षकांबरोबर शिक्षणाचा प्रश्‍न महत्त्वाचा आहे. सरकारच्या धोरणावर जितके आसूड ओढावेत तितके कमीच आहेत. पण शिक्षकांनीही पुढाकार घ्यावा.
राजा आदाटे – 8767501111