शिक्षक हे शिक्षण नावाच्या गाड्याचे सारथी असून, या गाड्याला योग्य दिशेने नेऊन आदर्श समाज निर्माण करण्याचे काम शिक्षक करत असतात. एखादा डॉक्टर चुकला, तर रुग्णाच्या जीवास धोका निर्माण होऊ शकते, इमारत बांधतांना एखादा इंजिनीअर चुकला तर इमारत कोसळेल. परंतु, एखादा शिक्षक चुकला किंवा त्याने योग्य शिक्षण दिले नाही तर संपूर्ण पिढी बर्बाद होईल आणि एखादी पिढी बर्बाद झाली तर संपूर्ण समाज वाम मार्गाने जाईल व समाजात अराजकता माजेल. एखादा कुंभार जसा माठ घडवतो तसे शिक्षकांकडून शाळेत असताना प्रत्येक विद्यार्थ्यांवर संस्कार टाकले जातात. संस्कार रुजवण्याचे काम करणारी व्यक्ती म्हणजे शिक्षक. मात्र, आज संस्कारक्षम समाज घडवणारा शिक्षक अनेक मागण्यांसाठी सरकारशी झगडतो आहे. काही क्षुल्लक मागण्यादेखील सरकारकडून सोडवले जात नाही. त्यामुळे शिक्षकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. आज शिक्षक अनेक कारणाने मानसिक ताणतणावाखाली वावरत आहे.
गेल्या दहा पंधरा वर्षांपासून विनाअनुदानित शाळेत नोकरी करत असलेल्या शिक्षकाला वेतन सुरू झालेले नाही. दहा पंधरा वर्षांपासून वेतन मिळत नसल्याने शिक्षक आर्थिक विवंचनेत जगतो आहे. एक रुपयादेखील वेतन मिळत नसल्याने कुटुंब चालवावे कसा, हा प्रश्न शिक्षकांसमोर आहे. विनाअनुदानित शिक्षकांचे प्रश्न तर प्रलंबित आहे सोबतच अनुदान शाळेच्या शिक्षकांचे प्रश्न कायम आहे. पगार 1 तारखेला व्हावे, पगार राष्ट्रीयीकृत बँकेत जमा व्हावे, 2009 नंतर सेवेत दाखल झालेल्या शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागण्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे शाळांना शंभर टक्के अनुदान मिळावे यासाठी पाठपुरावा करून करून तळवे झिजले. मात्र, सरकार याकडे लक्ष द्यायला तयार नाही. आज सरकारमध्ये असणार्यांनी विरोधात असताना त्यांनीदेखील शिक्षकांच्या याच मागण्यांसाठी तत्कालिन सरकारशी भांडत सरकारला लक्ष केले होते.
ऑक्टोबरमध्ये 2014 शिक्षकांच्या एका मोर्चाला भेट देत तत्कालीन विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी आगामी काळात भाजप सरकार सत्तेत येणार असून, शिक्षणमंत्री म्हणून मी राहणार आहे, असे भाकीत वर्तवले होते तसेच मी शिक्षणमंत्री झाल्यानंतर एकाही शिक्षकाला रस्त्यावर उतरू देणार नाही असे आश्वासन दिले होते. याची आठवण विधान परिषदेत शिक्षणावर चर्चा करताना बोलताना शिक्षणमंत्र्यांना करून देण्यात आले. शिक्षणमंत्र्याची गोची झाली. आज भाजप सरकार सत्तेत आले आणि विनोद तावडे शिक्षकमंत्रीदेखील झाले. मात्र, शिक्षकांचे प्रश्न आहे ते कायमच आहे. या सरकारच्या तीन वर्षांच्या काळात शिक्षणावरील खर्चात घट झालेली आहे. 2014-15 मध्ये 2.19 टक्के, 2015 यात किंचित वाढ झाली आहे. त्यानंतर 2016-17 मध्ये 1.98, 2017-18 मध्ये 2.11 तर पुढील वर्षात केवळ 2.09 टक्के खर्चाचे अंदाज अंदाज पत्रकात वर्तविण्यात आले आहे. एकंदरीत बघता यात दरवर्षी घट झाली आहे.
– प्रदीप चव्हाण
जनशक्ति, मुंबई
7767012208