पानशेत । हवेली तालुक्याच्या खानापूर येथील जि. प. प्राथमिक 24 शाळेतील शिक्षकांना सोमवारी (दि.27) मूल्यवर्धन प्रशिक्षण देण्यात आले. या कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने खानापूरचे सरपंच नारायण जावळकर आणि शिक्षणप्रेमी आर. जी. यादव यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी केंद्रप्रमुख प्रज्ञा निंबुतकर यांनी प्रशिक्षणाचे प्रास्ताविक केले.
केंद्रप्रमुख पांडुरंग थिटे यांनी प्रशिक्षणाचा उद्देश सांगितला. प्रशिक्षक मच्छिंद्र हिलाळ यांनी मूल्यवर्धन विविध उपक्रमाची माहिती देऊन उपक्रमाचे महत्व सांगितले. प्रशिक्षक शुभांगी भोसले यांनी अनेक सहयोगी खेळातून राज्यघटनेतील मूल्ये आणि मूल्यवर्धन उपक्रमातील मूल्यांचा उपयोग किती परिणामकारक असतो? याची माहिती दिली. प्रशिक्षक प्रिया चव्हाण यांनी दृकश्राव्य साधनांच्या वापरातून विद्यार्थ्यांमध्ये संस्कारांची रुजवणूक कशी करावी? याचे प्रात्यक्षिक करून दाखवले. यावेळी खानापुरच्या मुख्याध्यापिका स्वाती भालशंकर यांनी सूत्रसंचलन केले. तर, मोहन शिंदे यांनी आभार मानले.