जळगाव : दिवाळीची सुरवात २१ ऑक्टोबरपासून होत आहे. त्यानिमित्ताने शाळा, शिक्षक व विद्यार्थ्यांना २० ऑक्टोबर ते ७ नोव्हेंबरपर्यंत सुटी असणार आहे. ८ नोव्हेंबर रोजी गुरुनानक जयंती असून त्या दिवशीही सुटी असेल. नोव्हेंबरपासून शाळा पुन्हा पूर्ववत सुरू होतील, असे प्राथमिक शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.
यंदा १८ दिवस शाळा बंद
दरवर्षी शाळांना दिवाळीनिमित्त सुटी असते. २१ ऑक्टोबरला वसुबारस असून २१ व २२ ऑक्टोबरला धनत्रयोदशी आहे. दिवाळीच्या निमित्ताने यंदा १८ दिवस शाळा बंद राहतील. कोरोनामुळे शाळा दोन वर्षांपासून बंद राहिल्याने दिवाळी सुटीत देखील विद्यार्थ्यांवर शिक्षकांचे लक्ष असणार आहे. पहिली ते पाचवीतील विद्यार्थ्यांना अंकगणित, अक्षर ओळख व्हावी हा त्यामागील हेतू असणार आहे. दोन वर्षे शाळा बंद राहिल्याने असंख्य विद्यार्थी अभ्यासात अजूनही पिछाडीवर आहेत. ऑनलाइन शिक्षण घेता न आलेल्यांना विशेषत: सर्वसामान्य कुटुंबातील मुलांची गुणवत्ता सुधारण्यावर भर दिला जात आहे. दिवाळी सुटीत शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या आवडीच्या विषयावर निंबध लिहिणे, वाचन सराव, अंक व अक्षर ओळख याकडे लक्ष द्यायचे आहे. शिक्षकांना त्याची सक्ती नाही, पण स्वेच्छेने शिक्षकांनी ते काम करायचे आहे.
दिवाळीपूर्वी होणार वेतन
दिवाळीनिमित्त राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना यंदा प्रत्येकी साडेबारा ते १५ हजारांचा अग्रिम मिळेल. पण, त्यात शिक्षकांचा समावेश नसणार आहे. शिंदे-फडणवीस सरकार लोकहिताचे निर्णय घेत असताना आता दिवाळीमुळे शिक्षकांसह राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना नोव्हेंबरचे वेतन ऑक्टोबर अखेरीस मिळणार आहे.
दिवाळीपूर्वी शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्या
जळगाव – जिल्हा परिषदेच्या दोन हजार ७९८ शाळांमधील शिक्षकांची आंतरजिल्हा बदली आठ-दहा दिवसांत होणार आहेत. एकाच शाळेवर पाच वर्षे सेवा बजावलेल्या शिक्षकांची दुसऱ्या शाळेत बदली होणार आहे. त्यासाठी त्यांना एकूण २० शाळांचे पर्याय द्यायचे आहेत. ऑनलाइन पद्धतीने त्यांना पर्यायातील एक शाळा मिळेल. यंदा प्रथमच ही बदली प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने होणार असल्याने वशिलेबाजी किंवा मानवी हस्तक्षेप चालणार नाही. ज्या तालुक्यात शिक्षक कमी, त्या ठिकाणीही काही शिक्षकांची बदली होऊ शकते. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या निर्णयानुसार तसा बदल शक्य आहे.