भुसावळच्या ज्ञानासह मनोरंजन ग्रुपतर्फे फैजपूर मुख्याधिकारी यांचा सत्कार
फैजपूर – प्रत्येकाच्या आयुष्यात शिक्षकाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. माझ्याही सेवेची सुरुवात शिक्षकी पेशानेच झाली आहे. आता महसूल विभागात काम करण्याची संधी मिळाली आहे. त्याबद्दल शिक्षक मित्रांनी कार्यालयात येऊन सत्कार केला. हा सत्कार माझ्यासाठी हृदयस्पर्शी ठरला असल्याचे प्रतिपादन फैजपूर नगरपरीषदेचे नवनियुक्त मुख्याधिकारी किशोर चव्हाण यांनी येथे केले. भुसावळ येथील ज्ञानासह मनोरंजन ग्रुपमधील शिक्षकांतर्फे फैजपूर नगरपरीषद कार्यालयात जाऊन नवनियुक्त मुख्याधिकारी किशोर चव्हाण व भुसावळ गटसाधन केंद्रातील शिक्षण विस्तार अधिकारी रागिणी चव्हाण यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.
सत्काराने भारावलो -मुख्याधिकारी
प्रास्ताविकात ग्रुपप्रमुख डॉ.जगदीश पाटील यांनी मुख्याधिकारी किशोर चव्हाण यांचा जिल्हा परीषद शिक्षक ते मुख्याधिकारी असा प्रवास सांगून त्यांचा परीचय करून दिला. त्यानंतर उपस्थित शिक्षकांतर्फे चव्हाण दाम्पत्याचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देतांना मुख्याधिकारी किशोर चव्हाण म्हणाले की, शिक्षक मित्रांनी केलेल्या सत्काराने मी भारावलो. ज्ञानासह मनोरंजन या व्हॉट्सअप ग्रुपच्या शिक्षकांनी एकत्र येवून आतापर्यंत विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले आहेत. ग्रुपमधील आचार्य महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांचा आशीर्वाद सदैव सर्वांच्या पाठीशी असतो. या ग्रुपचा सदस्य असल्याचा मला अभिमान आहे. ग्रुपच्या शिक्षकांनी कार्यालयात येऊन केलेला सत्कार माझ्यासाठी संस्मरणीय ठेवा ठरला असल्याचेही चव्हाण यांनी आपल्या मनोगतात सांगितले. सूत्रसंचालन प्रा.उमाकांत पाटील यांनी तर आभार संजय ताडेकर यांनी मानले. यावेळी ग्रुपप्रमुख डॉ.जगदीश पाटील, ज्ञानेश्वर घुले, दिलीप ढाके, पुष्कर चौधरी, हेमांगिनी चौधरी, ललितकुमार फिरके, प्रा.उमाकांत पाटील, संजय ताडेकर, प्रा. चंद्रकांत बोरोले, विनय भोगे, रामराव मुरकुटे, गणेश इंगळे यांची उपस्थिती होती.