शिक्षकांनी घोकंपट्टीपेक्षा अध्यापन कौशल्यावर भर देणे गरजेचे 

0
शिक्षण व सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी केले मार्गदर्शन
महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाचे 24 व्या राज्यस्तरीय अधिवेशनाचे उद्घाटन 
आळंदी : पवित्र पोर्टलमुळे संस्था चालवणे हे काम सोपे राहिले नाही. शिक्षणामधील भ्रष्टाचार थांबविण्यासाठी शिक्षक ऑनलाईन भरती करण्याचा हेतू आहे. त्यामुळे या क्षेत्रात पारदर्शकता राहील. तसेच शिक्षकांनी घोकंपट्टीपेक्षा अध्यापन कौशल्यावर भर देणे गरजेचे आहे. जे विद्यार्थी राज्य व देश पातळीवर खेळांमध्ये प्रावीण्य मिळवतात त्यांच्यासाठी नोकरीमध्ये 5 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच विद्यार्थी केंद्रबिंदू मानून शिक्षण प्रणालीमध्ये आवश्यक तेथे विविध बदल करण्यात येत आहेत. भविष्यातही हे बदल सुरू राहणार आहेत. संस्थाचालक, शिक्षणाधिकारी व मंत्री यांची त्रैमासिक बैठक घेऊन यापुढे जे जी.आर.प्रसिद्ध करायचा आहे त्याचे या बैठकीत वाचन करून त्यानंतरच तो प्रसिद्ध केला जाईल. संस्थाचालक, शिक्षक व विद्यार्थी यांचे प्रश्‍न व समस्या यांचे निराकरण करण्यात येणार असल्याचे, राज्याचे शिक्षण व सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी सांगितले. श्री ज्ञानेश्‍वर शिक्षण संस्थेच्या श्री ज्ञानेश्‍वर विद्यालय व कॉलेजच्या प्रांगणात महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाचे 24 व्या राज्यस्तरीय अधिवेशनाचे उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
यांची होती उपस्थिती
याप्रसंगी अध्यक्षस्थानी महामंडळाचे अध्यक्ष माजी केंद्रीय मंत्री विजय नवल पाटील, माजी आमदार विजयराव गव्हाणे, मेधा कुलकर्णी, डॉ.सुधीर तांबे, उच्च शिक्षण महाराष्ट्र राज्याचे संचालक डॉ.धनराज माने, डॉ.अनिल पाटील, डॉ.विशाल सोळंकी, माध्यमिक व उच्च माध्यमिकचे संचालक गंगाधर मम्हाणे, प्राथमिक विभाग संचालक सुनील चव्हाण, ज्ञानेश्‍वर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सुरेश वडगांवकर, स्वागताध्यक्ष गणपत बालवडकर, पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष विजय कोलते, पुणे शहर शिक्षण मंडळाचे अध्यक्ष राजीव जगताप, पिंपरी-चिंचवड शिक्षण मंडळाचे अध्यक्ष तुकाराम गुजर, अजित वडगांवकर आदी उपस्थित होते.
टाळ-मृदंगाच्या जयघोषात प्रारंभ
कार्यक्रमाचा प्रारंभ टाळ-मृदंगाच्या जयघोषात झाला. दीप प्रज्ज्वलन तसेच गौरव महाराष्ट्राचा विजेता कौस्तुभ गायकवाड याच्या ईशस्तवनाने व दिव्यांग विभागाच्या मुलींच्या स्वागत गीताने अधिवेशनास सुरुवात करण्यात आली. प्रास्ताविकात गणपतराव बालवडकर यांनी शिक्षणाचा दर्जा व विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवण्याचा प्रयत्न महामंडळाने केला. महामंडळाची स्थापना विजय नवल पाटील यांनी केली. या महामंडळाच्या मार्फत संस्थांच्या व शिक्षकांच्या अडी-अडचणी शिक्षण मंत्र्यांसमोर मांडण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले. या प्रसंगी महामंडळाचे अध्यक्ष विजय नवल पाटील यांनी सांगितले की, 82 टक्के विद्यार्थी हे खाजगी विना अनुदानित संस्थेतून शिक्षण घेत आहेत. शिक्षण मंत्र्यांनी समन्वय समिती गठित करून संस्था चालकांच्या मागण्या सोडविण्याचा प्रयत्न करावा असे आवाहन केले. अभिनव शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अशोकराव मुरकुटे यांनी आभार मानले. सूत्रसंचालन सूर्यकांत मुंगसे यांनी केले. कार्तिकी गायकवाडच्या पसायदानाने समारोप झाला.