शिक्षकांनी फिरविली शिक्षक पुरस्काराकडे पाठ; केवळ 18 प्रस्ताव प्राप्त

0

जळगाव। जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून शिक्षण क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणार्‍या शिक्षकांना गेल्या दोन वर्षांपासून शिक्षक पुरस्कार देण्यात येत आहे. जिल्ह्यातील 15 तालुक्यांमधील 15 शिक्षकांना हे पुरस्कार देण्यात येतात, मात्र यंदा 15 शिक्षक पुरस्कारांसाठी जिल्ह्यातून केवळ 18 प्रस्ताव आले आहेत. पुरस्कारांसाठी शिक्षकांना एक महिन्याची वेतनवाढ रद्द करण्यात आल्याने व पुरस्काराची रक्कम कमी असल्याने जिल्ह्यातील शिक्षकांनी या पुरस्कारांकडे पाठ फिरविली आहे. जिल्हा परिषदेकडून शिक्षक दिनानिमित्त शालेय स्तरावर विद्यार्थ्यांसाठी चांगले उपक्रम राबविणार्‍या शिक्षकांना शिक्षक पुरस्कार दिले जातात. हे पुरस्कार जिल्हा परिषदेने 2011 पासून बंद केले होते. मात्र 2015 मध्ये तत्कालीन जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी आस्तिकुमार पांडेय यांनी हे पुरस्कार सुरु केले होते.

6 सप्टेंबर रोजी वितरण
2015 मध्ये जिल्ह्यातील 30 ते 35 शिक्षकांनी या पुरस्कारांसाठी अर्ज केले होते. मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी शिक्षकांनी प्रस्ताव पाठविण्याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येते. यावर्षी केवळ 18 शिक्षकांनी पुरस्कारासाठी अर्ज दाखल केले आहेत. जिल्ह्यातील सर्व तालुक्यातुन शिक्षकांची पुरस्कारासाठी निवड करण्यात येणार आहे. पुरस्कारासाठी निवड झालेल्या शिक्षकांना 5 सप्टेंबर रोजी गणेश विसर्जन असल्याने 6 सप्टेंबर रोजी या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे.

केवळ दी-ड हजाराची रक्कम
आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त शिक्षकांना एक महिन्याची वेतनवाढ दिली जात होती. मात्र ती वेतनवाढ देखील जि.प.कडून बंद करण्यात आली आहे. यासह पुरस्कार्थींना पुरस्कारासाठी केवळ 1 हजार 500 रुपये दिले जातात. त्यामुळे शिक्षकांनी या पुरस्कारांकडे पाठ फिरविल्याची चर्चा आहे. आधी आदर्श शिक्षक पुरस्कार नावाने हे पुरस्कार दिले जात होते. मात्र या पुरस्कारातुन ‘आदर्श’ नाव देखील काढण्यात आले आहे.

मुलाखती घेण्यात येणार
झेडपी प्रशासनाकडे प्राप्त झालेल्या 18 प्रस्तावांच्या कागदपत्रांची पडताळणी जि.प.कडून करण्यात आली आहे. तसेच पुढील आठवड्यात 28 व 29 ऑगस्ट रोजी 18 शिक्षकांच्या मुलाखती घेण्यात येणार आहेत. मुलाखत समितीत जि.प.मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांसह शिक्षण समिती सभापती पोपट भोळे, प्राथमिक शिक्षण अधिकारी भास्कर पाटील, माध्यमिक शिक्षणधिकारी देविदास महाजन आदींचा समावेश आहे.