शिक्षकांनी बदलते शिक्षण धोरण समजावून घ्यावे

0

राजगुरूनगर । आधुनिक तंत्रज्ञानामुळे शिक्षण प्रणालीत मोठ्या प्रमाणात बदल होत असून, विद्यार्थ्यांची अध्ययनाची गतीही वाढली आहे. त्यामुळे शिक्षकांनीही बदलते शिक्षण धोरण समजावून घ्यावे, असे आवाहन उपशिक्षणाधिकरी (माध्यमिक) डॉ. भाऊसाहेब कारेकर यांनी केले. जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था जिल्हा परिषद, माध्यमिक विभाग व पंचायत समिती शिक्षण विभागाच्या वतीने वाकी खुर्द (ता. खेड) येथील पायस मेमोरिअल स्कूलमध्ये नववीच्या शिक्षकांना जलदगती अध्ययन कार्यक्रम अंतर्गत प्रशिक्षण देण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी गटशिक्षणाधिकारी सोपान वेताळ उपस्थित होते.

नववीतील विद्यार्थ्यांचे मराठी, इंग्रजी, गणित व विज्ञान या विषयांचे संबोध स्पष्ट आहेत की नाही हे पाहण्यासाठी 17 जुलैला त्यांची पायाभूत परीक्षा घेण्यात येणार असून, त्यात अनुत्तीर्ण होणार्‍या विद्यार्थ्यांसाठी जलदगती अध्ययन कार्यक्रम दोन महिने राबविण्यात येणार आहेत. दोन टप्प्यांत झालेल्या या प्रशिक्षणात तालुक्यातील 272 शिक्षक सहभागी झाले होते. त्यांना नवनाथ धोत्रे, एस. एम. शिंदे, पी. के. पवळे, एस. व्ही. खंडागळे, प्रशांत सोनवणे, नागनाथ विभूते यांनी मार्गदर्शन केले. उपशिक्षणाधिकारी संजय नाईकडे व अधिव्याख्याता डॉ. राजेश बनकर यांच्या उपस्थितीत प्रशिक्षणाचा समारोप झाला. गट समन्वयक दयानंद शिंदे व विलास जाधव यांनी संयोजन केले.