शिक्षकांनी मुलांना चंगळवादाच्या विळख्यातून बाहेर काढावे

0

पुणे । प्रत्येक मुलामध्ये एक कथा दडलेली असते. ती समजण्यासाठी शिक्षक ती किती समृद्धपणे घेतो, सकसपणे घेतो यावर सगळं अवलंबून आहे. शिक्षकांनी मुलांना भाषा चांगली बोलायला शिकवून त्यांना प्रलोभनं, चंगळवादाच्या विळख्यातून बाहेर काढून चांगली पिढी घडवावी, असे आवाहन ज्येष्ठ साहित्यिक डॉ. अरूणा ढेरे यांनी आज येथे केले.
बालगंधर्व रंगमंदिरातील पहिल्या शिक्षक साहित्य संमेलनाचा समारोप प्रसंगी डॉ. ढेरे बोलत होत्या. स्वागताध्यक्ष आमदार विजय काळे, शिक्षणाधिकारी डॉ. गणपत मोरे, दिपक माळीसह आदी उपस्थित होते. या समारोप समारंभात स्वच्छ भारत अभियानाबद्दल हुजूरपागेची विद्यार्थिनी पूर्वी गवळी हिने काढलेल्या चित्राचे टपाल तिकीट काढले आहे. त्याबद्दल पूर्वा व तिच्या पालकांचा यथोचित गौरव करण्यात आला.

टागोरांची आठवण ठेवावी
डॉ अरूणा ढेरे म्हणाल्या, नोबेल पारितोषिक मिळवणारे रविंद्रनाथ यांचे कायम आठवण शिक्षकांनी ठेवले पाहिजे. शिक्षक काय करू शकतो तर शिक्षक एक साहित्यिक घडवतो हे रविंद्रनाथांनी दाखवून दिले आहे. त्यामुळे त्यांची आठवण ठेवणे गरजेचे आहे. त्यांच्या प्रमाणे आपल्यातही विचार, भावना व्यक्त करणारी आंतरिक ओढ असली पाहिजे. काही झाले तरी मी हे जग सुंदर करून दाखवीन. असे त्यांंनी सांगीतले

शिक्षकांनी साहित्यिक व्हावे
साहित्यिक आपल्या भोवतीच्या समाजाला, वातावरणाला स्पष्ट शब्द देऊ शकतो. शिक्षकांना भाषेची देणगी ही त्यांच्या पेशानेच दिलेली असल्याने शिक्षकांनी साहित्यिक व्हावे. साहित्याने दिलेली देणगी मुलांपर्यंत पोचवावी. आपल्या समोर वर्गात असलेल्या नव्या पिढीत साहित्यिक निर्माण व्हावेत यासाठी मुलांना पाठ्यपुस्तकाच्या बाहेरचे ज्ञान द्या. मुलांना चांगली भाषा वापरायला, बोलायला शिकवा, असेही त्या म्हणाल्या