जुन्नर । रॉयल सोसायटी ऑफ केमिस्ट्री लंडन, एसएसआयडी पुणे, जुन्नर तालुका विज्ञान अध्यापक संघ व विद्यासंस्कार प्रतिष्ठान जुन्नर यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय शिक्षक प्रशिक्षण शिबीर नुकतेच संपन्न झाले. यावेळी शिक्षकांनी वैविध्यपूर्ण अध्यापन कौशल्यातून विज्ञान शिकवणे गरजेचे असल्याचे, मत ज्येष्ठ विज्ञान संशोधक विमला ओक यांनी व्यक्त केले. एसएसआयडी संस्थेचे अध्यक्ष प्रा सुभाष कत्ते अध्यक्षस्थानी होते.
विज्ञानात विद्यार्थ्यांना अधिक रुची निर्माण व्हावी यासाठी प्रयोगशाळेत नेऊन मुलांना प्रयोग अधिक प्रमाणात दाखवले पाहीजेत, त्यासाठी पुरेसा वेळदेखील शिक्षकांनी दिला पाहीजे अशी अपेक्षा ही त्यांनी व्यक्त केली शिबीरात माध्यमिक तसेच उच्च माध्यमिकच्या विद्यार्थ्यांना विज्ञान विषय अधिक रोचक पद्धतीने कसा शिकवावा, प्रात्यक्षिकाद्वारे शिकवताना,कोणती काळजी घ्यावी, मुलांचा अधिक प्रमाणात सहभाग प्रयोगशाळेत प्रयोगात कसा वाढवावा या विषयी या शिबीरात विशेष मार्गदर्शन करण्यात आले. प्रा सुभाष कत्ते यांनी नवीन पीढीतील मुलांचे मुलभूत विज्ञान अधिक प्रगल्भ झाले पाहीजे अशी अपेक्षा व्यक्त केली.
कृतियुक्त अध्यापनावर भर द्या
शिक्षकांनी काळाची गरज ओळखून अध्यापन पद्धतीत बदल करणे आपेक्षित असून कृतियुक्त अध्यापनावर भर दिला पाहिजे यासाठी जुन्नर तालुका विज्ञान अध्यापक संघ शिक्षकांसाठी सतत नाविन्यपूर्ण उपक्रम राबवीत असतो असे मत गटशिक्षणाधिकारी के.डी. भुजबळ यांनी व्यक्त केले. प्रात्यक्षिकाद्वारे प्रभावी अध्यापन पद्धतीचे मार्गदर्शन येथील अण्णासाहेब आवटे विद्यालयाच्या प्रयोगशाळेत सहभागी शिक्षकांनी घेतले. जुन्नरचे गटशिक्षणाधिकारी के. डी. भुजबळ, विद्यासंस्कार प्रतिष्ठानचे संचालक धर्मेंद्र कोरे, विश्वास भालेकर, हनुमंत गाडेकर, अण्णासाहेब आवटे विद्यालयाचे मुख्याध्यापक के. एस. ढोमसे, पर्यवेक्षक भागवत, विज्ञान अध्यापक संघाचे अध्यक्ष रतिलाल बाबेल, सचिव टी. आर. वामन, उपाध्यक्ष वाय. बी. दाते आदी उपस्थित होते.