शिक्षकांनी सखोल विश्लेषणातून अध्यापन करावे

0

अधिव्याख्याता प्रा. शैलेश पाटील यांचे मत
पहूर – आजच्या विद्यार्थ्यांची आकलन क्षमता वाढत असून शिक्षकांनी अध्यापन करताना सखोल विश्लेशन पध्दतीचा उपयोग करावा, विद्यार्थ्यांच्या क्षमता समजून घेऊन अध्यापन करावे, असे प्रतिपादन जिल्हा शैक्षणिक व व्यावसायीक सातत्यपूर्ण प्रशिक्षण संस्था, जळगांवचे अधिव्याख्याता प्रा. शैलेश पाटील यांनी केले. पहूर केंद्राच्या वतीने आयोजीत शिक्षण परिषदेत ते बोलत होते. सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयात नुकतेच शिक्षण परिषद आयोजित करण्यात आली. प्रारंभी विद्यार्थीनींनी ईशस्तवन सादर केले. यावेळी सरस्वती देवी आणि सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांचे पुजन करण्यात आले. प्रास्ताविक केंद्र भानुदास तायडे यांनी केले.

उपस्थित मान्यवरांनी केले मार्गदर्शन
याप्रसंगी मुख्याध्यापिका श्रीमती घोंगडे, विषयतज्ज्ञ पंकज रानोटकर, राणाजी जगताप, सुदाम चव्हाण आदी मान्यवरांची उपस्थिती होती. गणिताचे मुलभूत संबोध आनंददायी कृतीयुक्त अध्यापन पद्धतीचा उपयोग करुन दृढ कसे करावेत? या विषयी राज्य प्रशिक्षक पंडीत बावस्कर यांनी प्रात्यक्षिक सादर केले. टाकाऊ वस्तूंपासून शैक्षणिक साहित्यनिर्मिती या विषयावर आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त पी.टी. पाटील यांनी तासिका घेतली. भूमीतीय आकारांचे प्रात्यक्षिकातून ज्ञान या त्यांच्या प्रयोगात सर्वांनी सक्रिय सहभाग घेतला. ‘दिक्षा अॅप’ च्या प्रभावी वापराबद्द्ल गणेश राऊत यांनी मार्गदर्शन केले. कराटे स्पर्धत जिल्हयावर निवड झाल्याबद्दल प्रशिक्षक एच.बी.राऊत यांचा सत्कार करण्यात आला. सुत्रसंचालन गणेश राऊत यांनी केले. शंकर भामेरे यांनी आभार मानले. यशस्वीतेसाठी शांताराम भंगाळे, उमेश तळेले, रविंद्र खोडपे, कीर्ती घोंगडे, स्नेहल चौधरी, महेश मोरे आदींचे सहकार्य लाभले.