शिक्षकांवर कारवाईचा बडगा

0

जुन्नर । जुन्नर तालुक्याच्या आदिवासी भागातील शाळेत वेळेवर न येणार्‍या सहा शिक्षकांची वेतनवाढ रोखण्याची कारवाई पंचायत समितीच्या शिक्षण विभागाचे गटशिक्षणाधिकारी के. डी. भुजबळ यांनी केल्याने एकच खळबळ उडाली.

एकमेकांशी संगनमत करून शाळेला दांडी मारण्याचा उद्योग शिक्षक करत होते. त्यांच्यावर जरब बसविण्यासाठी ही कारवाई करण्यात आली. त्याचप्रमाणे कर्तव्यात कसूर करणार्‍या चार शिक्षकांना ताकीद देण्यात आली आहे. आदिवासी भागातील शाळेबाबत शिक्षण विभागांकडे ग्रामस्थ व पदाधिकार्‍यांकडून तक्रारी आल्या होत्या. याबाबत अचानकपणे शाळांना भेट दिल्यानंतर दांडीबहाद्दर व कर्तव्यात कसूर करणारे शिक्षक आढळून आले. शाळेत उशिरा येणे, संगनमताने रजेचे अर्ज दाखविणे, रजा घेऊनही रजेची नोंद न अशा विविध कारणांवरून आदिवासी भागातील पाच शाळेतील सहा शिक्षकांना जबाबदार धरून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसानीस कारणीभूत वेतनवाढ रोखण्याची कारवाई केली आहे. एकनाथ रावते, विठ्ठल शेळके, रामदास गवारी, अरुण डोळस, दीपक विरणक व निशा साबळे यांच्यावर ही कारवाई करण्यात आली. शैक्षणिक गुणवत्ता वाढ करणार्‍या शिक्षकांच्या पाठीशी शिक्षण विभाग असेल, मात्र कामचुकार लोकांची गय केली जाणार नाही, असे गटशिक्षणाधिकारी के. डी. भुजबख यांनी यावेळी बोलताना सांगितले.