निगडी : विद्यार्थ्याला साक्षर करण्यापेक्षा सुशिक्षित करण्याची गरज आहे. संस्काराची जोड दिल्यावर विद्यार्थी सुशिक्षित होईल. मात्र आज मुलांना सुशिक्षित करताना नीतिमूल्यांचा र्हास होत आहे. निःस्वार्थी विद्यार्थी घडविणारे शिक्षक उरले नाही. पालकांनी देखील स्वतःचे प्रगती पुस्तक तपासायची गरज आहे. शिक्षक बनायला सध्याची तरुण पिढी तयार नाही. शाळेत आरेला कारे करणारे विद्यार्थी तयार होत आहे. बदलते व्यवस्थापन व शासकीय नियम, शिक्षक कमी आणि विद्यार्थी संख्या जास्त अशी अनेक आव्हाने शिक्षकांसमोर उभी आहेत, असे मत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.नितीन करमाळकर यांनी काढले. द इंटरनॅशनल असोशिएशन ऑफ़ लायन्स क्लब्जच्या रिजन 4-5 आणि चिंचवड मल्याळी समाजम यांच्या संयुक्त विद्यमाने आकुर्डीत आयोजित केलेल्या शिक्षक कृतज्ञता सन्मान सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या छत्रपती शाहू महाराज प्राथमिक विद्यालय दिघी येथील शिक्षिका वंदना शिवाजी आहेर यांच्यासह शहरातील 35 शिक्षक व 7 शैक्षणिक संस्थाचा गौरव करण्यात आला. यावेळी प्रांतपाल रमेश शहा, ओमप्रकाश पेठे, अभय शास्त्री, बी.एल.जोशी, टी.पी.विजयन, के.व्ही.जनार्दन, आनंद मुथा, डॉ.हेमंत अगरवाल, हरिदास नायर आदी उपस्थित होते.
लायन्स क्लबतर्फे राबविला उपक्रम
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शैलजा सांगळे व दिगंबर ढोकले यांनी केले आभार टी.पी.विजयन यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राजीव कुटे, सरस सिन्हा, प्रशांत कुलकर्णी, सत्येन भास्कर, मनोज बंसल, एस.त्यागराजन, विनय सातपुते, आनंद खंडेलवाल, विजय अगरवाल, प्रकाश सुत्रावे यांनी विशेष परिश्रम घेतले.