शिक्षकाकडून तिसरीच्या विद्यार्थ्यास मारहाण

0

सु.ग.देवकर शाळेतील घटना
जळगाव – घरून शाळेचा अभ्यास करून आला नाही म्हणून शिक्षकाने तिसरीच्या विद्यार्थ्यास मारहाण केल्याची घटना सु.ग.देवकर शाळेत घडली. शाळा सुटल्यानंतर मारल्याचे व्रण दिसून आल्याने हा प्रकार दिसून आला. दुपारी उशीरापर्यंत शिक्षकाविरोधात तक्रार देण्याचे काम सुरू होते. मिळालेल्या माहितीनुसार, जितेश सुनिल सोनार (वय-7) हा सु.गा.देवकर शाळेत इयत्ता तिसरीच्या वर्गात शिकत आहे. दोन दिवसांच्या सुट्टीनंतर आज शाळेत गेला. वर्ग शिक्षक रविंद्र पाटील यांनी दिलेला अभ्यास जितेश सोनारने करून आणला नाही म्हणून लाकडी पट्टीने उजव्या पायावर तर चापटांनी गालावर मारले. शिक्षकाने मारहाण केल्याने त्यांच्या पायाला आणि गालाला व्रण आले होते. शाळा सुटल्यानंतर त्याची आत्या सुशिलाबाई राजेंद्र सोनार त्याला घेण्यासाठी शाळेच्या गेटवर आल्या. विद्यार्थी जितेश शाळेतून बाहेर आल्यानंतर त्याला मारहाण केल्याचे आत्या सुशिलाबाई यांच्या लक्षात आले. त्यावेळी शिक्षकाने मारहाण केल्याचे जितेशने सांगितले. विद्यार्थ्यास मारहाण केल्याची घटना सकाळी 10 वाजेच्या सुमारास घडली होती. मारहाण केल्याचे दिसतात पालकांनी थेट जिल्हा पेठ पोलीसात धाव घेतली होती. दरम्यान विद्यार्थी हितेश याच्या वडीलांचे निधन झाले होते तर आई कपडे व भांडे धुण्याचे काम करते. त्याला 15 वर्षाची मोठी बहीण असून ती नववी शिक्षण करत आहे. आत्याच्या राहत्या इमारतीत तिसऱ्या मजल्यावर भाड्याच्या घरात राहतात. दुपारी उशीरापर्यंत शिक्षकाविरोधात जिल्हा पेठ पोलीसात तक्रार देण्याचे काम सुरू होते.