थिरुअनंतपूरम-केरळमध्ये परीक्षेला बसण्याआधी विद्यार्थिनीला अंतर्वस्त्र काढायला लावण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विद्यार्थिनीने पोलिसांत तक्रार केली असून परीक्षा सुरु असताना परीक्षक छातीकडे एकटक पाहत असल्याचा आरोप केला आहे. विद्यार्थिनी ६ मे रोजी नीट परिक्षा देण्यासाठी गेली असताना हा प्रकार घडला आहे. विद्यार्थिनीने केलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी तक्रार दाखल करुन घेतली असून तपास सुरु केला आहे.
नीट परीक्षा
विद्यार्थिनी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे देशभरातील वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी राष्ट्रीय पातळीवर घेण्यात येणाऱ्या नीट परीक्षेसाठी कोप्पा येथील लायन्स स्कूलमध्ये गेली होती. यावेळी विद्यार्थिनीसोबत काहीजणींना लोखंडाचे हुक असल्या कारणाने अंतर्वस्त्रे काढून परीक्षा केंद्रात प्रवेश करण्यास सांगण्यात आले.
पोलिसात तक्रार
दरम्यान, सीबीएसईचे अधिकारी तरुण कुमार यांनी आमच्याकडे अद्याप अशी कोणतीही तक्रार आली नसल्याचे सांगितले आहे. पोलीस तक्रारीनंतर आम्ही चौकशी सुरु केली असून, पुढील आठवड्यापर्यंत रिपोर्ट येईल. केरळमध्ये यावर्षी जवळपास एक लाख विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे.