शिक्षकाने वक्ता, अभिनेता, नेता या तिहेरी भूमिका वठवण्याची गरज

0

भुसावळ। उपेक्षित घटकांना दात्यांचे पाठबळ शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणते. माणसं, पुस्तके पहिल्या भेटीत कधीच कळत नाहीत. चिकित्सकपणे ती वाचल्यावर विविधांगी पैलू उलगडतात. शिक्षकाने वक्ता, नेता, अभिनेता या तिन्ही भूमिका वठवणे गरजेचे आहे, असा सल्ला धरणगाव महाविद्यालयातील कवी प्रा.वा.ना. आंधळे यांनी येथे दिला.

दुर्वा समर्पण उपक्रमाची मुहूर्तमेढ
भुसावळात अंतर्नाद प्रतिष्ठानने ‘गणरायाला दुर्वा समर्पणाची’ हा उपक्रम हाती घेतला आहे. त्याची मुहूर्तमेढ शनिवारी सातपुडा शिक्षण संस्था संचलित भुसावळ हायस्कूलमध्ये रोवण्यात आली. त्यात विद्यार्थ्यांशी संवाद साधताना प्रा.आंधळे बोलत होते. अध्यक्षस्थानी डॉ.के.जी झांबरे होते. विचारमंचावर प्रमुख पाहुणे म्हणून उपनगराध्यक्ष युवराज लोणारी, नगरसेवक मुकेश पाटील, माजी नगरसेवक वसंत पाटील, संदीप रायभोले, भुसावळ हायस्कूलचे चेअरमन ए.एन.शुक्ला, जे.एस.चौधरी, बी.जी.सरोदे, मुख्याध्यापक हितेंद्र धांडे, डी.व्ही.इंगळे, प्रभाकर नेहेते, विवेक नरवाडे, ज्योती विश्वनाथ इंगळे यांची उपस्थिती होती.

मदतीसाठी केव्हाही तयार : युवराज लोणारी
प्रसंगी उपनगराध्यक्ष युवराज लोणारी म्हणाले की, सामाजिक उपक्रमांना लोकचळवळीचे स्वरुप यावे यासाठी कटिबद्ध आहे. अंतर्नादने आपल्याला आवाज द्यावा, मदतीसाठी तयार राहू. भुसावळ हायस्कूल ही केवळ शाळा नव्हे तर ती एक संस्कार केंद्र आहे. परिवर्तनाचा ध्यास घेऊन काम करणार्‍या गुरूजनांमुळे मी घडलो, असे गौरवोद्गार त्यांनी काढले. सूत्रसंचालन मनीष गुरचळ तर प्रास्ताविक अंतर्नादचे अध्यक्ष संदीप पाटील यांनी केले. आभार गायत्री सरोदे यांनी मानले.

कवितेतून केले प्रबोधन
कवी आंधळेंनी जन्म अन् मृत्यूपर्यंतचा प्रवास करताना माणसाला कविता कशी भेटत जाते? हे सूत्रबद्धपणे मांडले. ‘धरू नका ही बरे फुलावर उडती फुलपाखरे, काल पाकळ्या रात्री निजल्या, सकाळ होता सगळ्या उठल्या’, ही कविता तालासुरात सादर केली. स्वलिखीत ‘पप्पा माझ्या आईला बोलू नका, स्त्री जन्म आधीच आहे मुका’, ‘आई मला जन्म घेऊ दे’ या दोन्ही कविता सादर करताच विद्यार्थ्यांचे डोळे पाणावले.

कविता कमी शब्दात जीवनाचे तत्वज्ञान सांगते. ती साभिनय शिकवली तर अंतर्मनात घर करते. म्हणून शिक्षकात वक्ता, नेता, अभिनेता या त्रिगुणांचा संगम असायला हवा. ‘आई मला जन्म घेऊ दे’ या माझ्या कवितेचे 45 भाषांत झालेले भाषांतर आयुष्याचे खरे संचित आहे. या कवितेने सातासमुद्रापार ओळख निर्माण करून दिली. साहित्य, कला माणसाला वेगळी ओळख देते असेही कवी आंधळेंनी नमूद केले.या उपक्रमास शहरातील सुज्ञ पालकांसह विद्यार्थी-विद्यार्थिनींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.