पुणे-शाळेत वर्गमित्राशी वाद झाल्यानंतर शिक्षकांनी पाच दिवस शाळेत न येण्याची शिक्षा दिल्याने देहूरोड येथील दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने दगड खाणीत उडी मारुन आत्महत्या केली. विद्यार्थ्याच्या मृतदेहाचा शोध घेतला जात आहे.
शोध सुरु
देहूरोड येथील केंद्रीय विद्यालय शाळा नंबर दोनमध्ये शिकणाऱ्या शुभम सुरवाडेचे चित्रकलेचे पुस्तक फाडण्यावरुन मित्राशी वाद झाला. यानंतर शाळेतील शिक्षकांनी शुभमला पाच दिवस शाळेत न येण्याची शिक्षा दिली होती. यामुळे शुभम निराश होता. मंगळवारी संध्याकाळी शुभम विठ्ठलनगरच्या दगडी खाणीकडे जातो असे सांगून घरातून निघाला. बराच वेळ झाला तरी तो न परतल्याने कुटुंबियांनी त्याचा शोध घ्यायला सुरुवात केली.
शुभमने आत्महत्येपूर्वी सुसाईड नोट लिहीली असून यात त्याने आत्महत्या करत असल्याचे म्हटले आहे. ‘वर्गमित्राने माझे चित्रकलेचे पुस्तक फाडले. यावरुन वाद झाला होता. शिक्षकांनी माझ्यासह चार जणांना स्टाफ रुमच्या बाहेर बसवून ठेवले. वर्गातील बाकीची मुलंही शिक्षकांशी खोटं बोलली आहेत. शिक्षकांमुळेच मी टोकाचे पाऊल उचलत आहे’, असे शुभमने सुसाईड नोटमध्ये म्हटले आहे. दगडखाणीत पाणी भरले असून एनडीआरएफच्या पथकाच्या मदतीने शुभमचा शोध घेतला जात आहे.