गुरुगौरव सोहळ्यात धरणगावचे प्रा. वा. ना. आंधळेचा सल्ला; स्वर्गीय नारायण पाटील बहुउद्देशीय संस्थेचा उपक्रम
भुसावळ- निकोप समाजनिर्मितीचा अधिष्ठाता असलेल्याा शिक्षकांनी लोकसंवादी व्हावे. अध्यापनाचा वसा जोपासताना शिक्षकांनी विद्यार्थ्यांची आई होण्याचा प्रयत्न करावा. वर्गावर शिकवताना शिक्षकाने लय, ताल, सूरांचा त्रिवेणी संगम साधावा, असा सल्ला धरणगाव महाविद्यालयाचे प्रा. वा. ना. आंधळे यांनी येथे दिला. भुसावळातील स्व.नारायण पाटील बहुउद्देशीय संस्थेतर्फे बुधवारी लोणारी मंगलकार्यालयात गुरुगौरव सोहळा पार पडला. त्यात संवाद साधताना ते बोलत होते. नगरसेवक मुकेश नरेंद्र पाटील व महिला बालकल्याण सभापती अनिता सपकाळे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले.
व्यासपीठावर यांची होती उपस्थिती
व्यासपीठावर लोकनियुक्त नगराध्यक्ष रमण भोळे, मुख्याधिकारी रोहिदास दोरकुळकर, भोळे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.पी.फालक, नाहाटा महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.मिनाक्षी वायकोळे, अटल प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा नगरसेवक प्रा.डॉ.सुनील नेवे, सामाजिक कार्यकर्ते सतीश सपकाळे यांची उपस्थिती होती.
संस्काराच्या बळावरच समाजकार्याचा लळा -मुकेश पाटील
शिक्षकांनी केलेल्या संस्काराच्या बळावरच समाजकार्याचा लळा लागला. त्यांच्याकडून मिळालेल्या या शिदोरीच्या बळावरच संकटांवर मात करणे शक्य झाले. त्यांना वंदन करण्यासाठी या गुरुगौरव सोहळ्याचे आयोजन केले, असे मुकेश पाटील यांनी प्रास्ताविकातून नमूद केले. सूत्रसंचालन के. नारखेडे विद्यालयाचे शिक्षक शैलेंद्र महाजन यांनी केले.
समाजहितैषी, स्तुत्य उपक्रम
गुरुगौरव सोहळा समाजातील प्रत्येक घटकासाठी प्रेरणादायी व पथदर्शी आहे. ज्यांच्या डोक्यातून ही सुपीक कल्पना आकारास आली ते मुकेश पाटील व अनिता सपकाळे या दोघांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. या सोहळ्याच्या निमित्ताने शिक्षकांच्या तीन पिढ्या एकत्र आल्या ही फार मोठी उपलब्धी आहे, अशा भावना विचारमंचावरील मान्यवरांनी व्यक्त केल्या. नगराध्यक्ष रमण भोळे, मुख्याधिकारी दोरकुळकर, प्रा.डॉ.सुनील नेवे, प्राचार्य मीनाक्षी वायकोळे, प्राचार्य डॉ.आर.पी.फालक यांनीही विचार मांडले.
कविता समाजाला करतेय शहाणं
स्त्रीभ्रूणहत्यांचे वाढलेले प्रमाण पाहून अंत:करणाला ठेच पोहोचायची. समाजातील हे घृणास्पद चित्र बदलले पाहिजे म्हणून ‘आई मला जन्म घेऊ दे’ ही कविता लिहिली. अंतर्मनाचा ठाव घेणार्या या कवितेला जो लोकलळा लाभला तेच आपले खरे संचित आहे. तिचे जे 40 भाषांत भाषांतर झाली हीच आपली अक्षरश्रीमंती आहे. आपली लेखणी समाजाला शहाणं करण्याच्या कामी पडतेय याचा मनस्वी आनंद होतोय, अशी भावना प्रा. आंधळेंनी कातरस्वरात व्यक्त केली.
कविता गायनाने रसिक भारावले
माणूस जन्माला येतो तेव्हापासून ते आयुष्याच्या अखेरच्या प्रवासापर्यंत कविता सोबत असते, असे सांगत प्रा. आंधळेंनी कविता गायन करून आपला जीवनप्रवास अलगदपणे उलगडला. ‘धरु नका ही बरे, फुलावर उडती फुलपाखरे’ ही कविता तालबद्धपणे सादर करून त्यांनी उपस्थितांच्या काळजाचा ठाव घेतला. ‘पप्पा माझ्या आईला मारू नका’ या गीतातून शब्दांची ताकद काय असते? ते त्यांंनी सौदाहरण स्पष्ट केले. ‘आई मला जन्म घेऊ दे’ कवितेने तर उपस्थितांचे डोळे पाणावले.