शिक्षक दिनाच्या पूर्वसंध्येला पुरस्कारार्थींच्या नावाची घोषणा नाही; शिक्षकांमध्ये नाराजीचे वातावरण
जळगाव: मागील वर्षी शिक्षक दिनाच्या पूर्वसंध्येला जिल्हा परिषदेतर्फे ‘आदर्श शिक्षक’ पुरस्कार जाहीर करण्यात आले होते. यावर्षीही देखील शिक्षक दिनाच्या पूर्वसंध्येला शिक्षक पुरस्काराची यादी निश्चित होऊन नवे जाहीर करण्यात येईल असे बोलले जात होते. त्यामुळे प्रस्ताव पाठविण्यात आलेल्या शिक्षकांसह शिक्षण क्षेत्राला आस लागून होती. मात्र संध्याकाळपर्यंत यादी जाहीर करण्यात आलेली नव्हती. त्यामुळे शिक्षक दिनाच्या दिवशीच गुरुजी पुरस्कारापासून वंचित राहणार आहे. त्यामुळे यंदाही पुरस्कार सोहळ्यासाठी शिक्षक दिनाचा मुहूर्त हुकला आहे. दरवर्षी प्रमाणे शिक्षक दिनाच्या पूर्वसंध्येला पुरस्कार जाहीर होत असल्याने यावर्षी जाहीर झालेल्या पुरस्काराबाबत विचारणा करण्यासाठी शिक्षण समिती सभापती आणि प्राथमिक शिक्षणाधिकारी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र सभापती आणि शिक्षणाधिकारी यांनी प्रतिसाद दिला नाही.
शिक्षक दिनाचा मुहूर्त हुकला
प्रत्येक तालुक्यातून एक, असे १५ व एक उत्तेजनार्थ असे एकूण १६ पुरस्कार जाहीर होणार आहे. निवड समितीने जिल्ह्याभरातून आलेल्या प्रस्तावांची छाननी करुन अंतिम मंजुरीसाठी विभाग आयुक्तांकडे पाठवले होते. शिक्षक पुरस्काराचे वितरण शिक्षक दिनी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीतच वितरित व्हावे, यासाठी शिक्षक आणि शिक्षण समितीचे पदाधिकारी आग्रही होते. गेल्या वर्षी तब्बल महिन्याभरानंतर पुरस्काराचे वितरण झाले होते, यामुळे या पुरस्काराचे महत्त्व कमी होत असल्याची तक्रार शिक्षकांमधून केली जात आहेत.
पदाधिकारी यांच्यातील वादामुळे यादी रखडली
शिक्षक पुरस्कारासाठी मर्जीतील नावे समाविष्ट करण्यासाठी राजकीय हस्तक्षेप केले आहेत. यावरून जिल्हा परिषदेच्या दोन पदाधिकाऱ्यांमध्ये वाद देखील झाल्याची चर्चा आहे. त्यामुळे पुरस्कारातील पारदर्शकतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शिक्षक दिनाच्या पूर्वसंध्येला देखील पुरस्काराच्या घोषणेवरून वाद सुरु असल्याने यादी जाहीर करण्यात विलंब होत असल्याची चर्चा होती. गुणवत्तेच्या आधारावर पुरस्कारार्थीची निवड व्हावी यासाठी सभेत ठराव करण्यात आला मात्र वादामुळे ठरावाची कोठेही अंमलबजावणी होतांना दिसले नाही.