शिक्षक पतसंस्थेने दिला शिक्षकांना आर्थिक आधार

0

इंदापूर । राज्यातील सहकारी चळवळ व सहकारी संस्था पुढे घेऊन जाण्याचे काम सर्वांनी केले पाहिजे. हे काम इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेचे सर्व सभासद करीत आहेत. संस्थेने विविध योजना राबवून तालुक्यातील एक हजार शिक्षकांना आर्थिक आधार दिला आहे, असे प्रतिपादन राज्याचे माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केले.

इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षण पतसंस्थेच्या 94 व्या वार्षिक सभेत गुणगौरव समारंभात मार्गदर्शन करताना पाटील बोलत होते. सभेच्या प्रारंभी संस्थेचे संस्थापक स्वर्गीय जावडेकर गुरूजी, माजी खासदार स्वर्गीय शंकररावजी पाटील, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी गुणगौरव समारंभात शिष्यवृती प्राप्त विद्यार्थी, दहावी व बारावीमध्ये विशेष गुणवत्ता प्राप्त विद्यार्थी, स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळविलेल्या शिक्षकांची मुले, आदर्श शिक्षक, सेवानिवृत्त शिक्षक अशा सुमारे 120 गुणवंतांचा सत्कार करण्यात आला. वार्षिक सर्वसाधारण सभेत सभासद कर्ज मर्यादा 10 लाखांवरून 12 लाख करण्यात आली. संस्थेचे चेअरमन संभाजी काळे यांनी पाटील यांचा सत्कार केला. संस्थेचे चेअरमन संभाजी काळे, सभापती करणसिंह घोलप, उपसभापती देवराज जाधव, विलासराव वाघमोडे, भरत शहा, कैलास कदम, शिवाजी तरंगे, बाळासाहेब मोरे याप्रसंगी उपस्थित होते.

बदलीचे धोरण मागे घ्या
सध्या राज्याच्या शिक्षण विभागाने शिक्षकांच्या बदल्यासाठी चार पॅटर्न काढले आहेत. ते पॅटर्न शिक्षकांसाठी जाचक आहेत. बदलीचे हे धोरण मागे घ्यावे यासाठी मी शिक्षणमंत्र्यांना भेटून मार्ग काढणार आहे, अशी ग्वाही हर्षवर्धन पाटील यांनी यावेळी दिली.