शिक्षक पात्रता परीक्षेसाठी ‘डोमिसाइल’ सक्तीचे

0

मुंबई। शिक्षक नियुक्तीसाठी सक्तीचे असलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेचे (टेट) वेळापत्रक नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. यंदा या परीक्षेसाठी डोमिसाइल प्रमाणपत्राची अट ठेवल्याने अनेक उमेदवारांच्या चिंतेत भर पडली आहे. यंदा अचानक ही अट ठेवल्याने हे प्रमाणपत्र मिळविणे कठीण होत असून या प्रमाणपत्राअभावी अनेक उमेदवार परीक्षेपासून वंचित राहण्याची भीती व्यक्त केली जात आहे, अशी माहिती शिक्षण विभागातील सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, यासंदर्भात अनेक शिक्षकांनी तक्रार केल्यानंतर ही अट शिथील करण्याचे संकेत शिक्षण विभागाकडून देण्यात आले आहेत.

परीक्षेचे वेळापत्रक जाहीर
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने नुकतेच ‘टेट’चे वेळापत्रक जाहीर केले असून येत्या 22 जुलै रोजी ही परीक्षा घेण्यात येणार आहे. इयत्ता पहिली ते पाचवी आणि इयत्ता सहावी ते आठवीसाठी सर्व व्यवस्थापने, सर्व मंडळे, सर्व माध्यमे, अनुदानित, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित इत्यादी शाळांमध्ये शिक्षण सेवक/शिक्षक पदावर नियुक्तीसाठी उमेदवारांना प्रथमत: ही परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. यंदा या परीक्षेसाठी डोमिसाइल प्रमाणपत्र अनिवार्य करण्यात आल्याने अनेकांची त्यासाठी धडपड सुरू झाली आहे.

शिक्षण विभाग सकारात्मक
डोमिसाइल प्रमाणपत्राची अट शिथील करण्याच्या मागणीसाठी काही शिक्षकांनी नुकतेच शिक्षणमंत्री विनोद तावडे आणि शिक्षण सचिव नंदकुमार यांना निवेदन दिले आहे. त्यामुळे शिक्षण विभाग याकडे सकारात्मक दृष्टकिोनातून पाहत असून लवकरच यात बदल करण्याचे संकेत शिक्षण विभागातील सूत्रांकडून देण्यात आले आहेत. यासंदर्भात लवकरच परीक्षा परिषदेची विशेष बैठक बोलविण्यात आली असून या बैठकीत चर्चा करून अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती आहे.

प्रमाणपत्र मिळवण्यासाठी कसरत
हे प्रमाणपत्र मिळण्यासाठी साधारणत: एक महिन्याचा कालावधी लागतो. त्यामुळे इतक्या कमी वेळेत हे प्रमाणपत्र मिळविणे शक्य नसल्याने अर्ज भरताना अडचणी येत असल्याचे उमेदवारांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे ही अट शिथील करण्याची मागणी शिक्षकांकडून करण्यात येत आहे. यापूर्वी दोन वेळा झालेल्या परीक्षेत अशाप्रकारची कोणतीही अट ठेवण्यात आली नव्हती. यंदाच ही अट ठेवल्याने हा फटका बसत असल्याची खंत शिक्षकांनी व्यक्त केली.