शिक्षक बदली पारदर्शक आणि नियमानुसार

0

जळगाव । जिल्ह्यात 153 शिक्षकांची आंतरजिल्हा (दुसर्‍या जिल्ह्यातील शिक्षक) बदली करण्यात आली आहे. 25 जुलै रोजी जिल्हा परिषदेत समुपदेशन करीत शिक्षकांना पदस्थापना देण्यात आली. जवळपास 80 टक्के शिक्षकांनी बदली ठिकाणी हजर होण्यास संमती दर्शविली असून केवळ 20 टक्के शिक्षकांनी आंतरजिल्हा बदलीस विरोध करत बदली ठिकाणी हजर न होण्याची भुमिका घेतली आहे. आंतरजिल्हा बदली ही शासन नियमानुसार व पारदर्शकरित्या करण्यात आली असल्याचे शिक्षण सभापती पोपट भोळे यांनी सांगितले. 30-40 शिक्षकांनी बदली ठिकाणी हजर न होण्याची भुमिका घेतली आहे. शिक्षकांनी सोमवारी 31 रोजी शिक्षण सभापती भोळे यांची भेट घेऊन त्यांच्याकडे अडचणी मांडल्या. भोळे यांनी शिक्षकांची समजुत काढत यासंबंधी पालकमंत्र्यांशी चर्चा करुन न्याय देण्याचा प्रयत्न करुन असे आश्‍वासन त्यांनी शिक्षकांना दिले. जिल्ह्यात आंतरजिल्ह्या बदलीस 259 शिक्षक पात्र आहे. त्यापैकी समुपदेशनास 153 शिक्षक हजर होते. सेवा ज्येष्ठतेनुसार आंतरजिल्हा बदलीस पात्र शिक्षकांचे समुपदेशन करत बदली करण्यात आली.

सभापतींसमोर शिक्षक रडले
आंतरजिल्हा बदली करतांना राहत्या ठिकाणाहुन 230 किलोमिटर दुर बदली करण्यात आल्याचे दिसून आले आहे. दळणवळ तसेच पारिवारीकदृष्ट्या सोय नसलेल्या ठिकाणी बदली झाल्याने शिक्षकांनी विरोध दर्शविला आहे. पती-पत्नी एकत्रीकरण तसेच विधवा, अपंग, कुमारी शिक्षिकांना भावनिकरित्या समाधानकारक ठिकाणी बदली देणे अपेक्षीत असतांना मुख्यकार्यकारी अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी हुकुमशाही पध्दतीने बदली केल्याचे आरोप शिक्षकांकडून होत आहे. सभापती यांच्याकडे बदली रद्द करण्याच्या मागणीसाठी शिक्षक आले असता त्यांना अक्षरशःरडू कोसळल्याचे दिसून आले.

तालुकानिहाय बदल्या
पेसा क्षेत्र 11 बदल्या- चोपडा 2, यावल 1, रावेर 8, अवघड क्षेत्र 58 बदल्या- जामनेर 24, चाळीसगाव 06, बोदवड 03, यावल 06, रावेर 06,पारोळा 04, एरंडोल 01, भडगाव 01, पाचोरा 03, मुक्ताईनगर 04 तर सर्वधारण क्षेत्र 84 बदल्या- मुक्ताईनगर 17, भडगाव 08, धरणगाव 03, पाचोरा 10, भुसावळ 01, एरंडोल 08, पारोळा 02, बोदवड 06, जळगाव 03, यावल 11, जामनेर 11, चाळीसगाव 03, रावेर तालुक्यातील 5 गावांमध्ये आंतरजिल्ह्यातुन शिक्षकांना पदस्थापना देण्यात आली आहे.

ऐतिहासिक बदली
गेल्या अनेक वर्षापासुन दुर्गम डोंगराळ भागात शिक्षकांना सेवा देण्यात अडचणी येत होत्या त्यामुळे अशा भागात शिक्षक ज्ञानदानासाठी जात नव्हते. यामुळे दुर्गम डोंगराळ भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत होते. याविषयी अनेक तक्रारी होत्या. तक्रारी विचारात घेत शासनाच्या आदेशान्वये यावर्षी पेसा व अवघड क्षेत्र निहाय सर्वेक्षण करुन रिक्त असलेल्या ठिकाणी शिक्षक देण्यात आले असल्याने ही बदली ऐतिहासिक बदली असल्याचे सभापती भोळे यांनी सांगितले.