शिक्षक बदली प्रकरणी चौकशी करण्याची मागणी

0

जळगाव । शासनातर्फे यावर्षी बदल्यांसाठी नविन निकष जाहीर करण्यात आले आहे. फेबु्रवारी 2017 च्या शासन निर्णयानुसार शिक्षकांच्या बदल्या होणार आहे. बदलीसाठी अवघड व सोपे क्षेत्र निहाय सर्वेक्षण करण्यात आले आहे. शिक्षक बदली नियमात अनेक जाचक अटी असल्याने शिक्षकांनी विरोधात न्यायालयात याचिका दाखल केली आहे. 17 जून पर्यत याला स्थगिती मिळाली होती. शिक्षक बदलीसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहे.

जिल्हा अंतर्गत बदली करतांना जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाने सीईओंच्या गैरहजरीत शासन निर्णया विरोधात जात बदली केली असून शासन निर्णयाची पायमल्ली केली आहे. जिल्हा अंतर्गत बदलीची चौकशी करण्यात यावी अशी मागणी भाजपाच्या साळवा-बांभोरी गट जिल्हा परिषद सदस्य माधुरी अत्तरदे यांनी केली आहे. मुख्यकार्यकारी अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्याकडे चौकशीची मागणी पत्राद्वारे करण्यात आली आहे. बदल्या शासन निर्णयानुसार झाले असल्याचे सांगण्यात आले, परंतु विभागाने काढलेल्या आदेशामध्ये शासन निर्णयासंदर्भात उल्लेख दिसून येत नाही. बदल्या ह्या ग्रामविकास विभाग यांच्या आदेशानुसार करण्यात आल्यात त्या आदेशाची नोंद नसल्याचा त्यांनी सांगितले आहे. बदली करण्यासाठी आर्थिक देवाण-घेवाण केल्याची खात्री लायक वृत्त असल्याचा आरोप अत्तरदे यांनी केला आहे. 15 मे 2014 चा शासन निर्णय रद्द करण्यात आला असतांना गणपत वाल्हे यांची बदली रावेर तालुक्यतुन चोपडा तालुक्यात केली आहे.