मुंबई – महाराष्ट्रातील सर्व व्यवस्थापनाच्या अनुदानित, अनुदानास पात्र ठरलेल्या, अनुदानास पात्र असलेल्या शाळांमधील शिक्षकांची भरतीसाठी आता केंद्रीय पध्दतीने अभियोग्यता चाचणी (अॅप्टिट्यूड टेस्ट) घेण्यात येणार असून यामुळे खाजगी व शासकीय अनुदानित शाळांमधील भरती प्रकरणात होणाऱ्या गैरप्रकारांना आळा बसेल व शिक्षक भरती केवळ गुणवत्तेच्या आधारावर होईल, असा विश्वास शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी मंगळवारी एका पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
खाजगी व शासकीय अनुदानित शाळांमध्ये संस्थाचालकांमार्फत होणाऱ्या शिक्षक भरतीमध्ये गैरप्रकार वाढत चालले असल्याची तक्रार विविध शिक्षक संघटनांनी वेळोवेळी केली होती. उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानेही राज्यातील खाजगी व्यवस्थापनातील शिक्षकांच्या नेमणुका गुणवत्तेनुसारच करण्याचे धोरण निश्चित करण्याच्या सूचना शासनाला दिल्या होत्या. या पार्श्वभूमीवर यापुढे ज्या अनुदानित शाळांना शासनाकडून शासनाच्या माध्यमातून वेतन मिळते अशा सर्व शाळांमधील शिक्षक भरती ही केंद्रीय परीक्षा पध्दतीने करण्यात येणार आहे. या परीक्षा पध्दतीत उत्तीर्ण झालेल्या शिक्षकांची गुणवत्ता यादी प्रसिध्द केली जाईल व शिक्षकांच्या गुणवत्तेच्या आधारे पारदर्शी पध्दतीने ही भरती प्रक्रीया पूर्ण करण्यात येईल. त्यासाठी एक वेब पोर्टल प्रसिध्द करण्यात येईल. त्या पोर्टलच्या माध्यमातून शाळांमधील शिक्षकांची रिक्त जागा नमूद करण्यात येतील. तसेच वृत्तपत्रातसुध्दा जाहीरात देऊन या जागांची माहिती प्रसिध्द करण्यात येईल. या रिक्त जागांकरीता इच्छुक पात्र उमेदवार ऑनलाईन अर्ज करु शकतील, असेही तावडे यांनी सांगितले. हा निर्णय स्वयंअर्थसहाय्यित व खाजगी विनाअनुदानित शाळांना लागू राहणार नाही. सदर परीक्षेचे आयोजन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत होईल. राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील परीक्षा केंद्रे सदर परीक्षा यंत्रणेकडून निश्चित करण्यात येतील. सदर परीक्षा ऑनलाईन पध्दतीने घेण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.