रायगड । विधान परिषदेच्या कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुक कोणीच गांभीर्याने घेत नव्हते. मात्र यावेळेस सर्वच राजकीय पक्षांनी आणि संघटनांनी मोठ्या प्रमाणात या निवडणुकीत उडी घेतली आहे. त्यामुळे यावेळी निवडणूक चुरशीची झाली आहे.शिक्षक परीषदेचे कार्याध्यक्ष वेणूनाथ कडू, शिक्षक परीषदेचे विद्यमान आमदार रामनाथ मोते, शेकापचे बाळाराम पाटील, शिक्षक भारतीचे अशोक बेलसरे, टीडीएफचे नरसू पाटील, शिवसेना प्रणित शिक्षक सेनेचे ज्ञानदेव पवार यांच्यासह केदार जोशी, राजाराम पाटील, महादेव सुळे, तुळशीदास जाधव, मिलींद कांबळे असे अनेक उमेदवार निवडणुकीत आपले भवितव्य आजमावत आहेत. 3 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे.
शिक्षक परिषदेची यावेळी लागणार कसोटी
शिक्षक परिषदेने यावेळी परिषदेचे कार्याध्यक्ष वेणूनाथ कडू यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहेत. परंतु,मात्र सलग 2 वेळा कोकणचे प्रतिनिधीत्व करणारे शिक्षक परिषदेचे विद्यमान आमदार रामनाथ मोते यांनी बंडखोरी केली आहे. त्यामुळे या मतदारसंघातून सातत्याने विजय मिळवणार्या शिक्षक परिषदेची यावेळी कसोटी लागणार आहे. यावेळी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शेकाप यांची आघाडी झाली आहे. त्यामुळे कोकणची जागा शेकापसाठी सोडण्यात आली आहे. शेकापने रायगड जिल्हापरिषदेचे माजी अध्यक्ष पनवेलचे बाळाराम पाटील यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. शिक्षक भारतीचे अध्यक्ष अशोक बेलसरे पुन्हा एकदा ही निवडणूक लढवत आहेत. पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग हे 5 जिल्हे येतात. या निवडणूकीसाठी 37 हजार 644 मतदार मतदानाचा हक्क बजावतील. ठाणे जिल्हयात सर्वाधिक 15 हजार 736 मतदार आहेत. पालघरमध्ये 5 हजार 115, रायगडमध्ये 10 हजार 9, रत्नागिरी जिल्हयात 4 हजार 328 तर सिंधुदुर्गमध्ये सर्वांत कमी म्हणजे 2 हजार 456 मतदार आहेत. या निवडणुकीसाठी पसंतीक्रमाने मते द्यावयाची असल्याने किमान 50 टक्के मते घेणारा उमेदवार यात विजयी होणार आहे.