नंदुरबार । महाराष्ट्र विधान परिषदेच्या नाशिक विभाग शिक्षक मतदार संघाच्या निवडणूकीसाठी 25 जून रोजी मतदान होणार आहे. या मतदानासाठी मतदानाची वेळ दोन तासांनी वाढविण्यात आली असून नवीन मतदानाची वेळ सकाळी 7-00 ते सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत अशी केली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी, डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी दिली.
यामध्ये मतदान करण्यासाठी जांभळ्या शाईच्या स्केच पेननेच मतदान करणे, मतदान पसंतीक्रमानुसार असल्याने पहिल्या पसंतीच्या उमेदवाराच्या नावासमोर अंकी क्रमांक 1 लिहुन त्यानंतरच्या पसंतीच्या उमेदवारांना पुढचे पसंतीक्रम देऊन मतदान करावे. 1 अंक फक्त एकाच उमेदवाराच्या नावासमोर लिहणे. तसेच निवडणुकीत एकुण-16 उमेदवार निवडणुक लढवित असुन मतपत्रिकेवर पसंतीक्रम लिहावयाचा असुन फक्त अंकामध्येच (मराठी, देवनागरी, इंग्रजी व रोमन इ.) नमुद करता येतील. तसेच निवडणुक आयोगाने 6 जुनच्या आदेशानुसार एकुण-13 ओळखपत्राच्या पुराव्यांचा वापर ओळख पटविण्यासाठी दिला आहे. आदी सूचना दिल्या. या सुचनांचे काटेकोरपणे पालन करणेत यावे अशा सुचनाही जिल्हाधिकारी तथा सहायक निवडणुक निर्णय अधिकारी, डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, यांनी संबंधितांना दिल्या आहेत.
16 मतदान केंद्रे
नंदुरबार जिल्ह्यातील तालुकास्तरावर एकुण-16 मतदान केंद्र असुन, मतदान केंद्रावर पुरुष-4187 स्त्री-1081 एकुण-5268 मतदार आहेत. जिल्ह्यातील, तालुकास्तरावरील कार्यरत असलेले मतदान केंद्रावर नियुक्ती करण्यात आलेले, क्षेत्रिय अधिकारी, मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी-1, मतदान अधिकारी-2 व मतदान अधिकारी-3 यांना नुकतेच प्रशिक्षण देण्यात आले असून या प्रशिक्षण वर्गास उपस्थित असलेले अधिकारी/कर्मचारी यांना जिल्हाधिकारी तथा सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी, यांनी निवडणुक कामकाजाविषयी सुचना दिल्यात.