मुरुड : जूनच्या दुसर्या आठवड्यात दहावीचा ऑनलाइन निकाल जाहीर झाला. 24 जूनला विद्यार्थ्यांना मूळ गुणपत्रिकाही मिळाली. मात्र उत्तरपत्रिका तपासणारे शिक्षक आजही मानधनाच्या प्रतीक्षेत आहेत. शिक्षण मंडळाकडून अद्याप तरी मानधनाचे पैसे त्यांच्या बँक खात्यावर जमा झालेले नाहीत.
दरवर्षी शाळांना मूळ गुणपत्रिका देताना पेपर तपासणार्या नियामक आणि परीक्षकांच्या मानधनाचे धनादेश मुख्याध्यापकांकडे दिले जातात. यंदा 24 जूनला विद्यार्थ्यांना मूळ गुणपत्रिका देण्यात आली, पण गुणपत्रिकेबरोबर शिक्षकांच्या मानधनाचे धनादेश शाळेत पोहोचले नाहीत, असे टीचर्स डेमोक्रॅटिक फ्रंटचे राजेश पांडया यांनी सांगितले.
बँकेच्या कचाटयात अडकले मानधन?
परीक्षकांना तीन तासांच्या उत्तरपत्रिकेसाठी पाच रुपये तर दोन आणि अडीच तासांच्या उत्तपत्रिकेसाठी तीन रुपये मानधन मिळते. पेपर तपासणार्या शिक्षकांना मानधनाचे पैसे देण्याचे काम सुरू असून शिक्षकांना लवकरात लवकर त्यांच्या कामाचा मोबदला देण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे मुंबई विभागीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष दत्तात्रय जगताप यांनी सांगितले. जुलै महिन्यापासून शिक्षकांचे पगार मुंबई बँकेद्वारे होणार आहेत. जूनमध्ये बहुतांश शिक्षकांचे बँक खाते युनियन बँकेतच होते. त्यामुळे शिक्षण मंडळाला या खात्यात मानधनाचे पैसे जमा करण्यास काहीच हरकत नव्हती. आता शिक्षकांचे बँक खाते बदलाचे कारण शिक्षण मंडळाकडून पुढे करण्यात येत आहे. मात्र पैसे बँकेत जमा न करता मंडळाने मानधनाचा धनादेश शाळेमार्फत द्यावा अशी मागणी शिक्षकांनी केली आहे