‘शिक्षक मित्र’ संघटनेची आझाद मैदानात निदर्शन

0

मुंबई । महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने कमी पटसंख्येच्या 1300 मराठी माध्यमाच्या शाळा बंद करण्याचा घेतलेला निर्णय, मराठी माध्यमाच्या 80 हजार शाळा व सेमी इंग्रजी माध्यमाच्या सर्व वर्गतुकड्या टप्प्याटप्प्याने बंद करण्याच्या हालचाली तसेच खाजगी कंपन्यांना मोकळे रान करून शिक्षणाच्या बाजारीकरणाच्या शासनाच्या धोरणाच्या निषेधार्थ तसेच विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांच्या प्रलंबित असणार्‍या विविध मागण्यांसाठी ‘शिक्षक मित्र’ या संघटना इतर सहभागी संघटनांच्या वतीने आझाद मैदानात राज्य सरकारविरुद्ध आंदोलन करण्यात आले.

गरीब, होतकरू मुलांवर अन्याय
यावेळी संघटनेचे अध्यक्ष प्राचार्य बाळासाहेब म्हात्रे म्हणाले, आदिवासी, दुर्गम व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शाळा पटसंख्येच्या कारणावरून बंद करून गरीब व होतकरू विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या मूलभूत हक्कावर गदा आणणार्‍या तसेच सतत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांविरुद्ध धोरणे राबवून त्यांच्यावर अन्याय केला आहे.

या प्रसंगी मुंबई शिक्षक लोकशाही आघाडीचे अध्यक्ष जनार्दन जंगले, मुंबई ग्रॅज्युएट महासंघाचे अध्यक्ष राजू बंडगर, आदर्श शिक्षक सेवा संघाचे अध्यक्ष राजेश सिंग, बृहन्मुंबई विनाअनुदानित शाळा संघाच्या उपाध्यक्ष नाजनीन शेख, स्वाभिमानी शिक्षक संघटनेचे अध्यक्ष बाळकृष्ण गावंडे, एन. एन. लटपटे, विनय सिंग, हरिहरण सिंग, अशोक परदेशी आदी मान्यवर तसेच विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी उपस्थिती लावली.

18 मागण्यांसाठी आंदोलन
रात्रशाळा व रात्र कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांचे थकीत वेतन अदा करणे, 7 वा वेतन आयोग लागू करणे, मूल्यांकन झालेल्या व अनुदानास पात्र ठरलेल्या अघोषित प्राथमिक, माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना अनुदान देणे, शाळांच्या वेतनेतर अनुदानात वाढ करून ते देणे, अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करणे आदी मागण्या सरकारकडे करण्यात आल्या आहेत.