मुंबई । ज्युनिअर कॉलेज शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यासाठी राज्यभरातील शिक्षकांनी आक्रमक पवित्रा घेत येत्या 16 मार्च रोजी विधीमंडळावर धडकण्याचा निर्णय जाहीर केला. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी 6 मार्चपर्यंत याप्रकरणी अर्थमंत्र्यांबरोबर बैठक घेऊन हा प्रश्न निकाली काढण्याचे आश्वासन दिले होते. मात्र त्यानंतरही याप्रकरणी कोणताही अंतिम निर्णय न झाल्याने महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघटनेने बुधवारी आपली भूमिका स्पष्ट केली.
16 मार्चनंतरही जर मागण्या पूर्ण न झाल्यास 17 मार्चपासून बारावी पेपर तपासणीवर पूर्णत: बहिष्कार टाकण्यात येणार असल्याचे संघटनेने जाहीर केले. राज्यातील ज्युनिअर कॉलेज शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य कनिष्ठ शिक्षक संघटनेची शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्यासह गेल्या आठवड्यात बैठक झाली होती. शिक्षण विभाग ज्युनिअर कॉलेज शिक्षकांच्या मागण्यांसदर्भात सकारात्मक असल्याचे शिक्षणमंत्र्यांनी जाहीर केले होते. तर त्याचवेळी काही मागण्यांसाठी येत्या 6 मार्चपर्यंत अर्थमंत्र्यांशी बोलून पुढील कार्यवाही करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र हे आश्वासन न पाळल्याने शिक्षकांनी येत्या 16 मार्च रोजी विधीमंडळावर राज्यातील 72 हजार शिक्षकांचा विधानभवनावर मोर्चा निघणार आहे, असे शिक्षक संघटनेचे अध्यक्ष प्रा. अनिल देशमुख यांनी बोलताना जाहीर केले.