भुसावळ- शिक्षक व विद्यार्थ्यांचे एक अनोखे नाते असते, ते योग्य पद्धतीने जोपासले गेले पाहिजे, असे प्रतिपादन प्रा.सीमा पाटील यांनी केले. जळगाव रोड श्रीनगर येथील व्हिजन अॅकेडमीत डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त शिक्षकदिनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्या बोलत होत्या. याप्रसंगी प्रा.धीरज पाटील, निलेश चौधरी, प्रतीक सोनवणे उपस्थित होते. ‘देशासाठी चांगला विद्यार्थी घडवणे हे शिक्षकांच्या हातात असते, या माध्यमातून आपण आपल्या देशाला सुसंस्कृत व जबाबदार नागरीक देऊ शकतो. शिक्षकाने आपला पेशा सांभाळतांना त्यात नेहमीच अद्ययावत राहायला हवे,’ असेही प्रा.सीमा पाटील यांनी सांगितले. शिक्षक दिनाच्या निमित्ताने अॅकेडमीत विद्यार्थ्यांनी शिक्षकांची भूमिका अनुभवली. सुसंस्कृत विद्यार्थी घडविण्यासाठी लागणार्या बाबींवर विद्यार्थ्यांनी नाट्य सादर केले. शिक्षक दिनानिमित्त वृक्षारोपण करण्यात आले. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी लिहिलेल्या दि इंडियन फिलॉसॉफी, दि ब्रम्हा सूत्र, लिविंग विथ अ परपज, टर्निग ड्रीम इंटू रिऍलिटी, दि आयडियलिस्ट व्ह्यूव ऑफ लाईफ, दि फिलॉसॉफी ऑफ हिंदुईजम, दि बुद्धिजम ओमीनीबस, ईस्ट अँड वेस्ट इन रेलीजन, रेलीजन अॅण्ड सोसायटी, दि कन्सेप्ट ऑफ मॅन ह्या पुस्तकांची माहिती आणि त्यांच्या विविध क्षेत्रातील लिखाणांची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली.