शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांचे उपोषण

0

पुणे । शिक्षकेतर कर्मचार्‍यांच्या भरतीसंदर्भात शासनाने लवकरात लवकर निर्णय घ्यावा. या दिरंगाईमुळे शिक्षकांवर कामाचा अतिरिक्त ताण पडत असून यासाठी माध्यमिक शिक्षकेतर कर्मचारी संघटनेने सोमवारी उपोषण केले. लेखी आश्‍वासन मिळेपर्यंत आंदोलन सुरू ठेवणार असल्याचे कर्मचार्‍यांनी सांगितले.

गेल्या १४ वर्षापासून शिक्षकेतर कर्मचार्‍यांची भरती बंद, सुमारे ३२ हजार शिक्षकेतर कर्मचार्‍यांची पदे रिक्त, जवळपास ४० टक्के माध्यमिक शाळांत लेखनिक, प्रयोगशाळा परिचर, ग्रंथालय, शिपाईच रिक्त पदांमुळे कार्यरत नाहीत, अशा परिस्थितीत शाळा कशा सुरू ठेवायच्या, असा प्रश्न माध्यमिक शिक्षकेतर कर्मचारी संघटनेने उपस्थित केला आहे. राज्यात माध्यमिक शाळेतील शिक्षकेतर कर्मचार्‍यांची मंजूर पदे ९२ हजार इतकी आहे. त्यातील ६० हजार कर्मचारी कार्यरत असून, उर्वरित ३२ हजार पदे रिक्त आहेत. यासंदर्भात संघटनेने वेळावेळी आंदोलने, मोर्चे काढले. त्यावेळी आश्वासन दिले जाते. त्यानंतर मात्र काहीच कार्यवाही होत नाही. त्या पार्श्वभूमीवर शिक्षकेतर कर्मचार्‍यांची बंदी उठवावी, या मागणीसाठी शिक्षण आयुक्त कार्यालयाबाहेर मोर्चा काढत आमरण उपोषणास सोमवारपासून सुरुवात केली असल्याचे शिवाजी खांडेकर यांनी सांगितले.

खांडेकर म्हणाले, शिक्षकेतर कर्मचार्‍यांच्या भरतीसंदर्भात चिपळणूकर समिती नेमली होती. त्या समितीचा अहवालही शासनाकडे धूळखात पडून आहे. कनिष्ठ महाविद्यालय संघटना, राज्य मुख्याध्यापक महामंडळ, उच्च शिक्षण विभागाचे शिक्षकेतर कर्मचारी पाठिंबा दर्शविला आहे.

याबाबत शिक्षणमंत्र्याशी फोनवरून चर्चा केली. पुढील महिन्याभरात त्यांनी हा प्रश्‍न सोडवू असे सांगितले. मात्र तरीही जोपर्यंत लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नाही असा निर्णय घेतला आहे. पुणे, सोलापूर व नगर येथील अडीच हजार शिक्षकेतर कर्मचारी यात सहभागी झाले असल्याचे सहकार्यवाह शिवाजी खांडेकर यांनी सांगितले.