धुळे । राज्यातील प्राथमिक,माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळातील शैक्षणिक स्तर ढासळत चालला आहे. पाचवर्ष झाली तरी शिक्षकभरती बंद असल्याने तुटपुंज्या शिक्षकामुळे विद्यार्थीच्या शिक्षणावर परिणाम होत आहे .बेरोजगार संगणक शिक्षकांना नियमित करण्यात यावे, विना अनुदानित शाळा व तुकडया अनुदानास पात्र होऊनही हजारो शिक्षक वेतनापासून वंचित आहेत.या सह असंख्य प्रश्नानी व्यथित झालेल्या शिक्षकांना न्याय मिळवून देण्यासाठी पुण्यातील भिडे वाड्यापासून मुंबई येथील शिक्षण मंत्र्याच्या बंगल्यापर्यंत शिक्षण बचाव पदयात्रा अमरावती विभागाचे शिक्षक आ. श्रीकांत देशपांडे, पुणे विभागाचे शिक्षक आ. दत्तात्रय सावंत यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य सर्व श्रमिक संघाचे -धुळे जिल्ह्याचे अध्यक्ष दिनेश रघुनाथ महाले यांनी दिली आहे यांनी दिली.
हे होणार सहभागी
मुलींसाठी शिक्षणाची सोय करणार्या सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यातील भिडे वाड्यातील शाळेपासून सोमवार दि. 17 जुलै रोजी शिक्षण बचाव पदयात्रा सुरु होणार असुन रविवार दिनांक 23 जुलै रोजी शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या मुंबई येथील सेवा सदन बंगल्यावरती पोहोचणार आहे. या पदयात्रेत पुणे विभागाचे शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत,अमरावती विभागाचे शिक्षक आमदार श्रीकांत देशपांडे व शिक्षक सेनेचे प्रदेशाध्यक्ष ज.मो.अभ्यंकर हे सहभागी होणार आहेत.
विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहतील
विना वेतन काम करणार्या शिक्षकांना आर्थिक परिस्थितीमुळे सात दिवस बाहेर राहण्याचा किंवा आंदोलनाला जाण्या – येण्याचा खर्च होऊ नये तसेच शिक्षक आंदोलनात सहभागी झाले तर विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहतील यामुळे शिक्षण बचाव पदयात्रेत फक्त पुणे विभागाचे शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत,अमरावती विभागाचे शिक्षक आमदार श्रीकांत देशपांडे व शिक्षक सेनेचे प्रदेशाध्यक्ष ज.मो.अभ्यंकर हेच चालत जातील.पदयात्रेच्या पहिल्या व शेवटच्या दिवशी राज्यातील हजारो शिक्षक पदयात्रेत सहभागी होतील अशी माहिती महाराष्ट्र राज्य सर्व श्रमिक संघाकडून देण्यात आली आहे.
विनावेतन काम करणार्यांची उपासमारी
आयसीटी शिक्षकांना नियमित करण्यात यावे,पंधरा ते वीस वर्षापासून विनावेतन काम करणार्या शिक्षकांची उपासमारी थांबवण्यासाठी, दिनांक 1 व 2 जुलै 2016 ला पात्र झालेल्या व शाळा व तुकड्यांना त्वरित अनुदान मंजूर करावे.मुल्यांकन झालेल्या राज्यातील प्राथमिक,उच्च प्राथमिक,माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा व तुकड्यांची पात्र म्हणून यादी घोषित करावी,उच्च माध्यमिक शाळेतील वाढीव पदाना मंजुरी द्यावी.अंशत: अनुदानित शाळा व तुकड्यांना पुढील अनुदानाचा टप्पा द्यावा, रात्र शाळेतील अर्धवेळ शिक्षकांना सेवा संरक्षण द्यावे, शिक्षकेतर कर्मचारी भरती सुरु करावी, कला,क्रीडा व कार्यानुभव या विषयांसाठी पुर्वी प्रमाणे तासिका ठेवाव्यात व आर.टी.ई नुसार विशेष शिक्षक पदे मंजूर करावीत.