भोपाळ । गुरुग्राममधील रायन इंटरनॅशनल शाळेत झालेल्या प्रद्युम्न ठाकूर या 7 वर्षांच्या विद्यार्थ्याच्या हत्येनंतर पाच दिवसांनी सीबीएसई बोर्डाने अखेर मौन सोडले आहे. शाळेच्या आवारात विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची संपूर्ण जबाबदारी शाळा प्रशासनाची आहे, असं बोर्डाने जाहीर केले आहे. शाळांना परिपत्रक पाठवून सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचार्यांची मानसशास्त्रीय चाचणी (सायकोमेट्रिक टेस्ट) दोन महिन्यांच्या आत पूर्ण करण्याचे आदेश बोर्डाने दिले आहेत.
शाळांना परिपत्रक पाठवले
बुधवारी सीबीएसई बोर्डाने सर्व संलग्न शाळांना एक परिपत्रक पाठवले. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने शाळांनी काय खबरदारी घ्यावी त्याची नियमावली या परिपत्रकात आहे. येत्या दोन महिन्यांच्या आत शाळांनी आपले शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, स्वीपर्स, बसचालक, वाहक अशा प्रत्येकाची मानसशास्त्रीय चाचणी करून घ्यावयाची आहे.
मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी करा!
विद्यार्थ्यांना सुरक्षित वाटेल अशा वातावरणात शिकणे हा त्यांचा अधिकार आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने मनुष्यबळ विकास मंत्रालय तसेच मंडळ वेळोवेळी पाठवत असलेल्या मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी शाळांनी गांभीर्याने करावी, अशी अपेक्षा या परिपत्रकात व्यक्त करण्यात आली.
मनुष्यबळ विकासमंत्री काय म्हणाले
केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर म्हणाले, शाळांमध्ये महिला स्टाफ जास्तीत जास्त असला पाहिजे. याशिवाय महिलांनाच चालक आणि वाहक प्रशिक्षण दिले गेले तर मुलांची सुरक्षा अधिक खात्रीशीर मानली जाऊ शकते. मुलांच्या सुरक्षेवर शाळा आणि पालकांनी एकत्र येऊन हा प्रश्न सोडवला पाहिजे, कारण मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न महत्त्वाचा आहे.
राज ठाकरेंचं शाळांना पत्र
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यातील सर्व खासगी आणि सरकारी शाळा-महाविद्यालयांना विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत तडजोड करू नये, असं आवाहन केलं आहे. देशाचे भावी आधारस्तंभ असणार्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींचं लैंगिक शोषण झाल्याची अनेक प्रकरणं समोर आली आहेत. या घटनांमुळे मान शरमेने खाली गेली आहे. सरकार याबाबतीत गंभीर दिसत नाही, त्यामुळे मी स्वतः पत्र लिहून संवाद साधत आहे, असं राज ठाकरेंनी पत्रात म्हटले आहे.