मित्रांनो, अभ्यासाचे जे सहा विषय (म्हणजे तीन भाषा, तीन शास्त्रे) आहेत ते एकाच पध्दतीने अभ्यासून चालत नाही. आता गणिताचेच उदाहरण पाहायचे तर गणिताची एक वेगळी भाषा असते. त्यात फार थोडा भाग शब्दांनी व्यक्त केलेला असतो. आकडे, संबोध, प्रमेये, समीकरणे, आकृत्य, आलेख हे गणिताच्या भाषेचे व्याकरण झाले. पण जो गणित व्यवस्थित वाचतो तोच ती गणिते पायरीपायरीने (स्पेटबायस्टेप) सोडवू शकतो, तसे गुण मिळवत गणिताची भीती घालवू शकतो. मित्रांनो, गणिताप्रमाणेच विज्ञानातसुध्दा संबोध, सूत्रे, रासायनिक समीकरणे, विज्ञान प्रमेये, आकृत्या, व्याख्या, परिभाषिक शब्द यांच्या सहाय्याने सारी मांडणी केली असते. यालाच विज्ञानाचे व्याकरण म्हणतात. जर तुमचे ते व्याकरण चांगले तयार असेल, तर ना विज्ञानाची, ना गणिताची भीती मनात बसते.
मराठी, हिंदी, संस्कृत या तिन्ही भाषांच्या पाठ्यपुस्तकात गद्य, पद्म, स्थूलवाचन (व्याकरण) असे भाग असतात. जेव्हा तुम्ही एखादा धडा, एखादी कविता शिकत, वाचत, त्यावरचे प्रश्न समजावून घेत स्वत:च्या भाषेत उत्तर लिहिता; तेव्हा तो-तो भाग सहजपणे समजत ध्यानी बसतो. मराठीतील संदर्भासहित स्पष्टीकरण, लेखन (म्हणजे, निबंध, पत्र, उतार्यावरील प्रश्न वैगरे) हा भाग तसा वाचल्याने, सरावाने तयार होतो. तोच भाग हिंदीचाही आहे. संस्कृतमध्ये व्याकरण हा भाग तसा महत्त्वाचा पण त्याचाही बाऊ करण्याची गरज नाही. वाचनातील सर्व पायर्या जेव्हा तुम्ही समाजावून घेता. तेव्हा तो-तो भाग समजत जातो. मराठीच्या, हिंदीच्या प्रश्नपत्रिकेत एका वाक्यात उत्तरे द्या, गाळलेल्या जागा भरा, कोण-कोणास-केव्हा म्हणाले. योग्य पर्याय निवडासारखे वस्तुनिष्ठ प्रश्न विचारले जातात. अशा प्रश्नांच्या उत्तरात अचूकता महत्त्वाची असते. नेमके शब्द वापरावे लागतात. अशा वेळी आपण नेहमीच त्या-त्या निवषयांची पाठ्यपुस्तके नीट वाचणे जरुरीचे ठरते. शेवटी पाठ्यपुस्तक वाचणे ही अभ्यासातील फारच मोठी गोष्ट आहे. जी तुम्हाला चांगले गुण मिळवून देते. लेखन विभागासाठी वर्तमानपत्रांसह विविध पुस्तके, मार्गदर्शिका वाचणे, खूप गरजेचे आहे. तसेच त्यासंबंधीचे लिखाण स्वत: करणेही तेवढेच महत्त्वाचे आहे. अर्थात अगोदर म्हटल्याप्रमाणे जी मुले पाठ्यपुस्तके काळजीपूर्वक, लक्ष देऊन तपशिलात, शेवटपर्यंत पुन्हा पुन्हा वाचतात त्यांना सारे ज्ञान आत्मसात होते. चांगले यश मिळते.
टिपण नोट्स काढण्याचा सोप्या पध्दती
विद्यार्थी मित्रानो तुम्ही काढलेल्या नोट्स जेवढ्या उत्तम प्रतीच्या बेस्ट असतील तेवढी परीक्षेतील यशातील हमी अधिक होय!
1) सर्वात महत्त्वाची गोष्ट अभ्यासाला (आनंदानं) बसल्या अगोदर कुठल्या विषयाचा अभ्यास करणार आहात, हे ठरवून त्या प्रमाणे सुरुवात करा. त्या विषयासाठी आवश्यक ती पुस्तके संदर्भ ग्रंथ घेऊन बसा.
2) विषय कळत नाही ‘असं’ न म्हणता स्वत: अभ्यासाची टिपणं काढा. स्वत:च्या शब्दात ती टिपणं काढत पुढे ती वाढवा, त्यांचा विस्तार करा.
3) टिपणं काढतांना संदर्भ ग्रंथ, इंटरनेट, मोबाईल, तक्ते, चित्रे, आलेख यांचा डोळसपणे वापर करा. या सर्व साहित्यांचा वापर कुठे, कसा करायचा हेही ठरवा.
4) लिहिण महत्त्वाच मी असं का म्हणतोय माहितीय? कारण टिपणं काढतांना सार्या गोष्टी लिहिण महत्त्वाचं, त्यानंतर त्यांचा विस्तार करणं, त्यासाठी कार्ड, व्हाईस रेकॉर्डिंगचा वापर, प्रश्न काढणे व त्यावर सविस्तर उत्तर मिळविण हेही (नियमित) व्हायला हव.
5) टिपणं काढताना शब्दकोश, ग्रामरची पुस्तक यांचा वापर करा, व्याकरणाचा चुका टाळत छानसं लिखाण करा.
6) टिपणं काढण्यासाठी ग्रुप तयार करा विषयांची वाटणी करुन घेत शंकाचे निरसन करुन घ्या. परस्पराठाी चर्चा करणं हे नेहमीच चांगले असते.
7) सोप्याकडून कठीण विषयांकडे हा क्रम इथेही वापरा.
8) टिपणं काढतांना सुटे कागद (फाईल्स) पेन्सिल कलरपेन, हायलायनरजवळ ठेवा. टिपणं काढण्यासाठी वेळ ठरवा, टिपणं काढण हा कृतियुक्त अभ्यास आहे. त्यामुळे तो व्यवस्थित करा.
9) नोटस वाचणं मग टिपण काढणं व्हावं. हा मंत्र ध्यानी ठेवा!
– चंद्रकांत भंडारी, शिक्षण समन्वयक, शालेय विभाग, केसीई, सोसायटी,
मोबा. 9890476538