शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या विरोधात शिवसेनेचा हक्कभंग

0

मुंबई – मुंबई विद्यापीठाला कुलपती तथा राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी निकाल जाहीर करण्यासंदर्भात दिलेली मुदत विद्यापीठाला पाळता आली नसल्याच्या कारणावरून सरकारमध्ये सहभागी असलेल्या शिवसेनेकडून शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या विरोधात विधान परिषदेत मंगळवारी हक्कभंगाची सूचना दाखल करण्यात आली. मात्र, या सूचनेला विरोधी पक्षांच्या सदस्यांनी जोरदार विरोध केल्यामुळे उपसभापतींनी त्यावरचा निर्णय राखून ठेवला.

मुंबई विद्यापीठाने या वर्षापासून परीक्षांचे मूल्यांकन ऑनलाईन केले आहे. मात्र त्यासाठी पुरेशी तांत्रिक यंत्रणा नसल्याने विद्यापीठाच्या ४०० पेक्षा अधिक परीक्षांचे निकाल गेले अनेक दिवस रखडले. अखेर यामध्ये कुलपतींनी हस्तक्षेप करत विद्यापीठास ३१ जुलैपर्यंत निकाल जाहीर करण्याचे आदेश दिले होते. ही मुदत सोमवारी संपली. पण, सर्व निकाल जाहीर करण्यात मुंबई विद्यापीठाला अपयश आले. विधान परिषदेत शिक्षणमंत्री तावडे यांनी राज्यपालांनी दिलेल्या मुदतीत सर्व निकाल जाहीर होतील, असे आश्वासन दिले होते. त्यामुळे परिषदेतील शिवसेनेचे गटनेते अनिल परब यांनी तावडे यांच्याविरोधात हक्कभंगाची सूचना मांडली.

परब यांनी याबाबतचे निवेदन वाचताच काँग्रेसचे नारायण राणे यांनी आक्षेप घेतला. सत्ताधारी पक्षाच्या सदस्याला आपल्याच सरकारविरोधात हक्कभंग दाखल करता येत नाही, असे ते म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे यांनी राणे यांचे समर्थन केले. सत्ताधारी पक्षाच्या सदस्याला मंत्र्यांविरोधात हक्कभंगाची सूचना दाखल करायची असल्यास त्यांना सभागृहातील सात सदस्यांची सहमती हवी. हे सात सदस्य कोण, असा सवाल त्यांनी केला. उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी याबाबत नियम तपासून पाहिला जाईल, असे सांगत यावरील उत्तर राखून ठेवले.