‘शिक्षणव्यवस्थे’चे डोके ठिकाणावर आहे का ?

0

सशस्त्र क्रांतीचा पुरस्कार करणार्‍या क्रांतिकारकांची जी फौज निर्माण झाली आणि त्यांनी इंग्रजांना सळो की पळो करून सोडले, त्याचा खंबीर पाया ‘लोकमान्य टिळक’ यांनी घातला होता. त्यामुळे त्यांना ‘भारतीय असंतोषाचे जनक’ असे म्हणत. पण याऐवजी ‘आतंकवादाचे जनक’ असा उल्लेख करणे, हाच मुळाच वैचारिक अथवा शैक्षणिक आतंकवाद आहे. राष्ट्रपुरुषांच्या प्रतिमा मलिन करण्याचे हे षडयंत्र आहे.

राजस्थानमधील इंग्रजी माध्यमाच्या इयत्ता आठवीच्या समाजशास्त्र विषयाच्या संदर्भ पुस्तकात लोकमान्य टिळक यांचा ‘आतंकवादाचे जनक’ असा उल्लेख करण्यात आला आहे. याआधीही केंद्र सरकारच्या ‘आयसीएसई’च्या पाठ्यपुस्तकांमधून लाला लजपतराय, बिपीनचंद्र पाल, भगतसिंह, राजगुरू, सुखदेव आदी स्वातंत्र्यसैनिकांचा ‘आतंकवादी’ म्हणून उल्लेख करण्यात आला होता. केवळ सत्याग्रहांमुळे भारताला स्वातंत्र्य मिळाले नसून देशाच्या स्वातंत्र्यप्राप्तीमध्ये मोठा वाटा हा क्रांतिकारकांचा आहे.

राजस्थान सरकार केवळ हिंदी माध्यमांमधील पुस्तके प्रकाशित करते. त्यामुळे इंग्रजी माध्यमातील विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषेतील संदर्भ पुस्तकांवर निर्भर राहावे लागते. एखादे पुस्तक, त्यातूनही पाठ्यपुस्तकाशी संबंधित संदर्भ पुस्तक प्रकाशित करणे हे लिमिलेटच्या गोळ्या वाटण्याएवढे सोपे नसते. पुस्तकाचे भाषांतर केल्यानंतर ते भाषांतर योग्य आहे का, हे पडताळणीसाठी जाते. प्रकाशनापूर्वीही ‘प्रूफरिडिंग’ होते. अशा अनेक चाळण्यांमधूनही जर लोकमान्य टिळक यांच्याविषयी ‘आतंकवादाचे जनक’ असा उल्लेख होत असेल, तर तो अक्षम्यच मानावा लागेल. यात अजूनही एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे, काहीतरी गहन आणि क्लिष्ट माहितीतील ही चूक आहे, असेही नाही.

कोणाही सर्वसामान्य व्यक्तीला वाचताक्षणीच उपरोल्लेखित शब्दप्रयोग चुकीचा आहे, हे लक्षात येईल. यावरून पाठ्यपुस्तके अथवा संदर्भ पुस्तके लिहिताना कोणत्या प्रकारची काळजी घेतली जाते, ते लक्षात येईल. याशिवाय हे प्रकरणही जवळपास वर्षभराने उघडकीस आले. गेल्या वर्षी त्या वादग्रस्त संदर्भ पुस्तकाची प्रथम आवृत्ती प्रकाशित करण्यात आली होती. ‘गेल्या महिन्यात प्रकाशित झालेल्या सुधारित आवृत्तीमध्ये ही चूक दुरुस्त करण्यात आली आहे’, असा दावा केला जात असला, तरी मुळात हा गुन्हा झालाच कसा, याचे स्पष्टीकरण संबंधितांनी द्यायला हवे. ही केवळ भाषांतराची चूक नाही, तर याला देशद्रोहाचीच कृती मानावी लागेल. पाठ्यपुस्तक अथवा संदर्भपुस्तक यांमधील अक्षम्य चुकीचे हे काही पहिले उदाहरण नाही. याआधीही एन्सीआर्टीच्या पुस्तकांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास 5-6 ओळींमध्ये, तर मुघल आक्रमकांचा इतिहास पानेच्या पाने भरून देण्यात आला होता. त्या पुस्तकांमध्ये महाराणा प्रताप यांचा केवळ एका ओळीत उल्लेख होता. तेलंगणा राज्यातील इयत्ता सहावीच्या इंग्रजीच्या पुस्तकात ‘सुरतचा व्यापारी जॉन याने छत्रपती शिवाजी महाराजांचे प्राण वाचवले’, असा संदर्भहीन आणि मनमानी इतिहास देण्यात आला होता. ‘प्रमाणित’ नकाशे न देता हाताने काढलेले देशाचे अयोग्य नकाशे पाठ्यपुस्तकांमध्ये छापण्याच्या चुकाही याआधी अनेक वेळा झाल्या आहेत. या नकाशांमध्ये कधी अरुणाचल प्रदेश गायब केलेला असतो, कधी जम्मू आणि काश्मीर, तर कधी पंजाब! या चुका नजरचुकीने होत नाहीत, तर जाणीवपूर्वक केलेल्या असतात. स्वातंत्र्योत्तर काळात शैक्षणिक क्षेत्रात मनाने भारतीय नसणारे आणि साम्यवादी यांचे वर्चस्व निर्माण झाल्याने अशी दुर्दैवी परिस्थिती निर्माण झाली. देशाचा गौरवशाली इतिहास, भारतीयांची विजिगिषू वृत्ती शिकण्याऐवजी अन्य देशांच्या राज्यक्रांत्या आणि त्यांच्या सनावळ्या शिकण्यात विद्यार्थ्यांची शक्ती खर्च होते. इतिहास हा इतिहास असला, तरी त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन भारतीयत्वाचा असणे आवश्यक आहे. भारतीयत्वाच्या दृष्टीने इतिहासाचे पुनर्लेखन होणे आवश्यक आहे. ‘जी व्यक्ती आपला इतिहास विसरते, ती भविष्य घडवू शकत नाही’, असे म्हणतात. आपल्याकडे शिकवल्या जाणार्‍या पाठ्यपुस्तकांसंदर्भात ही गोष्ट तंतोतंत लागू पडते. इतिहास शिकून अभिमानाची भावना जागृत होण्यापेक्षाही विद्यार्थ्यांमध्ये न्यूनगंडाची भावना निर्माण करण्यास पाठ्यपुस्तके उत्तरदायी आहेत.

पाठ्यपुस्तकांचा केवळ परीक्षा देण्यासाठी उपयोग होत नाही, तर त्या माध्यमातून विद्यार्थ्यांची म्हणजेच देशाच्या भावी आधारस्तंभाची मने घडत असतात. जर ही मनेच भारतीयत्वाविषयीच्या नकारात्मतेने भारून गेली, तर त्यांच्याकडून भारताच्या नवनिर्माणाची अपेक्षा ठेवणे चुकीचे आहे. खोटा इतिहास विद्यार्थ्यांच्या माथी मारण्याचे प्रयत्न वर्ष 2014 नंतर तरी बंद होतील आणि विद्यार्थ्यांमध्ये वीरश्री निर्माण करणारा, प्राचीन वैदिक वाङ्मयाविषयी माहिती देणारा, देशप्रेम, शिस्त, माणुसकी, नैतिकता निर्माण करणारा अभ्यासक्रम आणि ते शिकवण्याची नावीन्यपूर्ण पद्धत विकसित होईल, अशी अपेक्षा होती, पण अजून तरी तिची पूर्तता झाली नाही. त्या परीक्षेमध्ये काँग्रेस काय आणि भाजप काय, आतापर्यंतची सर्व सरकारे नापास झाले आहे. प्रखर राष्ट्रभक्त असलेले लोकमान्य टिळक यांनी कदाचित ही सर्व परिस्थिती पाहून ‘शिक्षणव्यवस्थेचे डोके ठिकाणावर आहे का?’, असाच प्रश्‍न उपस्थित केला असता.

चेतन राजहंस,
प्रवक्ता, सनातन संस्था
7775858387