कोथरुड । मन आणि बुद्धी यांची फारकत झाली तर माणूस घडत नाही. सद्यस्थितीत शिक्षण क्षेत्रात नंबर दोनचा शिरकाव झाला आहे. त्यामुळे शिक्षणव्यवस्थेत संस्कार आणि मूल्यांचा अभाव आहे. परिणामी समाजात असंवेनशीलता फोफावत आहे. माणसातील आपुलकी लोप पावते आहे. त्यामुळे संस्कारक्षम शिक्षण आणि राज्यघटनेतील मूल्ये मुलांमध्ये रुजायला हवीत, असे प्रतिपादन ज्येष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव यांनी केले.
डीपर, सर फाऊंडेशन व तुम्ही-आम्ही पालक यांच्या संयुक्त विद्यमाने देण्यात येणारा संस्थापालक सन्मान 2017 सोहळा कोथरुड येथील जे. पी. नाईक प्रशिक्षण केंद्रात शनिवारी रंगला होता. त्यावेळी डॉ. आढाव बोलत होते. या कार्यक्रमात लातूर पॅटर्नचे जनक प्राचार्य अनिरुध्द जाधव यांना सन्मान 2017 पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. डॉ. आढाव यांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला. मानपत्र, सन्मानचिन्ह आणि 51 हजार रुपये रोख असे या पुरस्काराचे स्वरूप होते. डीपर, सर फाऊंडेशनचे संस्थापक हरीश बुटले, सचिव प्रा. संजय शहा, सदस्य डॉ. संजय करमरकर, आर. एस. जाधव आदी उपस्थित होते.
भ्रष्टाचारमुक्तीसाठी पुढाकार घ्या
स्मार्ट व्हीलेजच देशाच्या सुधारणेत महत्त्वाची भूमिका बजावू शकते. समाजजीवन सुधारण्यासाठी शिक्षणाचा विचार व्हावा. प्रत्येक स्तरातील लोकांना संधी मिळेल तेव्हा देश घडेल. संधी मिळाली तर खालच्या स्तरातील व्यक्तीही मोठ्या उंचीचा पल्ला गाठू शकते. देशासमोरील प्रश्न सोडविण्यासाठी आपण सर्वांनी एकत्रित प्रयत्न करणे गरजेचे आहे. भ्रष्टाचारमुक्तीसाठी आपण पुढाकार घ्यायला हवा, असे डॉ आढाव यांनी यावेळी सांगितले.
गाव बदलण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. त्यासाठी शिक्षणव्यवस्था सक्षम हवी. शहरात येणारे लोंढे पाहता गाव ओस पडेल की, काय अशी भीती वाटत आहे. गावात असुरक्षितता निर्माण झाली आहे. शिक्षकांची मानसिकता योग्य नाही. सध्याचे शिक्षणाची आर्थिक स्थिती पाहता येत्या काळात शिक्षण घेऊ शकतील की नाही याबाबत साशंक आहे. सुशिक्षित बेकारांची फौज तयार होऊ नये. शिक्षणातून संस्कार गायब झाले आहेत. महापुरुषांच्या जयंत्या, पुण्यतिथी याऐवजी त्यांचे विचार मुलांवर करावेत. संताच्या भूमीत असलेली प्रेरणा घेऊन तरुणांनी कृती करायला हवी. गावाच्या, देशाच्या विकासात योगदान द्यायला हवे, असे आदर्शगाव हिवरेबाजारचे सरपंच पोपटराव पवार यांनी यावेळी सांगितले. हरीश बुटले यांनी प्रास्ताविक केले. नागोराव येवतीकर यांनी सूत्रसंचालन तर प्रा. संजय शहा यांनी आभार मानले.