शिक्षणाचा समाजासाठी उपयोग करा : डॉ. दत्तात्रय बाळसराफ

0

अभियांत्रिकी पदवी प्रदान समारंभात व्यक्त केले मत

पिंपरी : प्रत्येकाने आपल्याला मिळालेल्या ज्ञानाचा समाजासाठी केला पाहिजे. आपण घेत असलेले
शिक्षण, नवीन आत्मसात करणारे कलाकौशल्य या गोष्टींचा उपयोग समाजहितासाठी अवश्य केला पाहिजे. ज्या समाजामध्ये आपण रहातो त्या समाजाचे काही देणे लागत असतो, त्या समाजाप्रती आपले काही देणे लागत असतो. आपण समाजाचे घटक म्हणून समाजासाठी केला पाहिजे, असे मत इंद्रायणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दत्तात्रय बाळसराफ यांनी नूतन अभियांत्रिकीमध्ये पदवीग्रहण कार्यक्रमात व्यक्त केले. विविध शाखांमधील विद्यार्थ्यांना डॉ. बाळसराफ यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या अभियांत्रिकी पदवी प्रमाणपत्रांचे प्रदान करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे विश्‍वस्त महेशभाई शहा हे उपस्थित होते. यावेळी अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. राजेंद्र कानफाडे, प्रा. नितीन धवस, विद्यार्थी प्रतिनिधी रोहित दाभाडे उपस्थित होते.

तरच यशाचे शिखर पार कराल
डॉ. बाळसराफ पुढे म्हणाले की, पदवीग्रहण केल्यानंतर विद्यार्थी दशेतून व्यावसायिक क्षेत्रात गेल्यावर पुढे आपली वाटचाल ही प्रगतीच्या वाटेवर असली पाहिजे. आपण नेहमी चांगल्या गोष्टी आत्मसात केल्या पाहिजे. त्याचा उपयोग आपल्या पुढील नोकरी, व्यवसायामध्ये करता आला पाहिजे. आपल्याला यशाचे शिखर पार करता येईल. शहा बोलताना म्हणाले की, विद्यार्थी हा राजदूत आहे. अभियांत्रिकीची पदवी प्राप्त करणे अवघड असले तरी ते विद्यार्थ्यांनी साध्य केले आहे. वेळ, कौशल्य हे तुम्ही लीलया वापरून या स्थानापर्यंत पोहचले आहात. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. राजेंद्र कानफाडे यांनी केले. आर्या सिंग आणि रुचा मुरगकर यांनी सूत्रसंचालन केले तसेच प्रा. गुरुप्रीत भट्टी यांनी आभार व्यक्त केले.