सोमेश्वरनगर । शेकडो मैलांवरून येणार्या स्थलांतरीत मुलांना ओझे समजू नका. उलट त्यांना शिक्षणाचा हक्क मिळवून देणे म्हणजे आपली सामाजिक बांधिलकीच आहे, असे प्रतिपादन बारामती तालुक्याचे गटशिक्षण अधिकारी किशोर पवार यांनी केले. शालेय शिक्षण विभाग, टाटा ट्रस्ट तसेच जनसेवा प्रतिष्ठान यांच्यातर्फे आशा प्रकल्प व पंचायत समितीचा शिक्षण विभाग यांच्या वतीने बारामतीच्या पश्चिम भागातील शिक्षकांची व शाळा समिती सदस्यांची संवाद कार्यशाळा सोमेश्वर विद्यालयात आयोजित करण्यात आली होती. येथील कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य ए. व्ही. भोसले यांनी कार्यक्रांचे अध्यक्षस्थान भूषविले. माजी प्राचार्य एस. डी. जगताप, केंद्रप्रमुख संजय गायकवाड, अनिल जगदाळे, सुधीर रणदिवे, मुख्याध्यापक आर. एन. भंडलकर, एल. डी. दरेकर, के. बी. नेवसे, व्ही. एम. वसेकर, महेश बैरागी आदी उपस्थित होते.
पटसंख्या वाढविण्याचे आव्हान
तालुक्यातील अनेक शाळांचा दर्जा अत्यंत चांगला असून जिल्हा परिषद शाळांबाबतची विश्वासार्हता वाढविण्यासाठी तो उपयुक्त ठरत आहे. बदल्यांच्या भयाने तालुक्याचा पट किंचित कमी झाला असला, तरी शालाबाह्य, स्थलांतरीत व ऊसतोड मजुरांची सर्व मुले शाळांमध्ये दाखल करून पटनोंदणी वाढविण्याचे आव्हान पटनोंदणी वाढविण्याचे आव्हान शिक्षक निश्चित पेलतील, असा विश्वास पवार यांनी यावेळी केला.
बालसंगोपन केंद्र उभारणार
ऊस तोडणी कामगारांच्या मुलांच्या शिक्षणातील अडथळ्यांचा अभ्यास करणे आणि त्याचे धोरणात रूपांतर करणे यासाठी प्रयत्नशील असून, लहान भावंडांना सांभाळणार्या मुलांसाठी पहाटे 3 ते दुपारी 4 या वेळेत चालू शकेल, असे बालसंगोपन केंद्र उभारण्याचाही प्रयत्न राहील, अशी माहिती टाटा ट्रस्टचे कार्यक्रम व्यवस्थापक परेश ज. म. यांनी दिली. अनिल चाचर यांनी शाळा समिती सदस्यांचे अधिकार व कर्तव्ये याविषयी मार्गदर्शन केले. संतोष शेंडकर यांनी प्रास्ताविक, तर हेमंत गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले. प्रशांत मोरे यांनी आभार मानले.