जून महिना म्हटलं की कसं सगळीकडे शिक्षणमय वातावरण असतं. शाळेतील अॅडमिशनसाठी पालकांची चाललेली धावपळ, गणवेश, वह्या -पुस्तकं, दप्तर, वॉटरबॅग, अशा शालेय खरेदीसाठी बाजारत झुंबड उडालेली असते. दुकानं हाऊसफुल्लंच असतात. पुणे तर शिक्षणाचे माहेर घर. इथे तर सारा माहोलच शिक्षणाचा. काल-परवा रस्त्यानं जाताना मोठी गर्दी दिसली. काय घडलं असावं बरं, या उत्सुकतेपोटी गाडी थांबवली आणि चौकशी केली तर समजलं ते सर्व पालकच होते आणि पुस्तकं खरेदी करण्यासाठी आले होते. अनेक शाळांनी त्या दुकानात आपली पाठ्यपुस्तक आणि वह्या मिळतील असं, पालकांना सांगितलं. मात्र, जबरदस्ती नव्हती, हे देखील एका पालकानं आवर्जुन सांगितलं. पुन्हा एक प्रश्न पडला दुकान तर पाच-दहा पायर्या चढून गेल्यानंतर आत आहे. मग हे सर्व रस्त्यावर कसे? तर समजलं या सदाशिव पेठेतील दुकानदार गृहस्थांनी बँकांप्रमाणे सर्व पालकांना टोकण नंबर दिले होते आणि दुकानाबाहेरच्या इलेक्ट्रॉनिक बोर्डवर टोकण नंबर आला की त्या पालकांनी जाऊन पुस्तकं घ्यायची, पैसे द्यायचे आणि निघायचं. कसलं झंझटच नाही. तर सांगायचा मुद्दा असा की, जूनमधील शिक्षणाच्या वारीच्या सुरवातीला अशा बर्याच गोष्टी पहायला मिळतात. याच दिवसात वारकर्यांना वेध लागतात ते विठ्ठलाच्या दर्शनाचे. शेतीची कामं आटोपून तो वारीत सहभागी होत पंढरीची वाट धरतो. सर्व पालख्या पंढरीच्या दिशेने चालू लागतात. असं पंढरीच्या वारीचं वातावरण याच दिवसात सर्वत्र असतं. तर दुसरीकडे शिक्षणाची वारीही निघालेली असते. जून महिन्यात हे दोन्ही सोहळे अनुभवता येतात. अर्थात पंढरीच्या वारी ही विठूरायाचा नामघोष करत निघालेली असते तर शिक्षणाची वारी विविध गोष्टींनी दरवर्षी गाजते-वाजते आणि जुलैमध्ये रूळावर येऊन वर्षभर सुरूच असते. याच महिन्यात दहावी-बारावीचे निकाल लागले. यावर्षी बारावीसाठी राज्यातून 14 लाख 29 हजार 478 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी 12 लाख 79 हजार 406 विद्याथी उत्तीर्ण झाले आहेत. म्हणजेच राज्याचा निकाल 88.23 टक्के लागला आहे. तर दहावीचा राज्याचा निकाल 88.74 टक्के लागला आहे. दहावीला 17 लाख 66 हजार 98 विद्यार्थी बसले होते त्यापैकी 15 लाख 6 हजार 485 विद्याथी पास झाले. यावर्षी दहावीत तब्बल 193 मुलांनी पैकीच्या पैकी गुण मिळविल्याने पहिला कोण आला हा प्रश्नच नव्हता. आता दहावी-बारावीला उत्तीर्ण झालेल्या या सुमारे 27-28 लाख विद्यार्थ्यांचा पास होण्याचा आनंद ओसरताच अॅडमिशनच्या चिंतेने त्यांना आणि पालकांना ग्रासले आहे. आता या दिव्यातून पार पडेपर्यंत त्यांच्या जीवातजिव नसणार हे उघडच आहे. एवढ्या मुलांना चांगलं शिक्षण देणारी महाविद्यालयं आहेत का? आणि ती असतील तर खिशाला परवडणारी असतील का? हे सर्व पहात या 27-28 लाख शिक्षणाच्या वारकर्यांची वारी मार्गस्थ होणार आहे. म्हणजे या वारीचा मार्गही तसा खडतरच म्हणायचा.
जूनमधील अशा या शिक्षणाच्या वारीच्या वातावरणात काही अन्य गंमती-जमती आणि घडामोडीही घडत आहेत. त्याची दखल घ्यावी अशाच या शिक्षणक्षेत्रातील बातम्या आहेत. साधारण दोन-चार दिवसापुर्वी अशीच एक बातमी येऊन धडकली. काय होती ही बातमी? आता म्हणे बीए, बीएस्सी सारख्या पदव्या कालबाह्य झाल्याने ते शिक्षणच बंद करणार. झालं, या पदव्या घेतलेल्यांना उगाचच अस्वस्थ वाटायला लागलं असणार. सहाजिकच असं वाटूही शकतं. कारण आपण एवढे कष्ट घेऊन पदवी मिळवली आणि आता या पीढिला ती कालबाह्य वाटू लागली असं वाटणारंच ना. आपली शिक्षण पध्दती ठरवताना भविष्याचा काहीच विचार केला जात नाही का? असाही प्रश्न यानिमित्ताने अनेकांना पडला असणार.कुणीतरी सोशल मीडियावरून हे पिल्लू सोडलं म्हणे, आणि त्याची बातमी सर्वत्र वार्यासारखी पसरली. थोडक्यात व्हायरल झाली. असं दुसर्यादिवशी समजलं. विद्यापीठ अनुदान आयोग (यूजीसी) बीए व बीएस्सी अभ्यासक्रम रद्द करणार असल्याची चर्चा ही शुद्ध अफवा आहे, असे स्पष्टीकरणच केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी केल्याने ती बातमी खोटीच होती हे स्पष्ट झालं आहे. केंद्रीय अर्थसंकल्पात यूजीसी व अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद म्हणजे एआयसीटीई यांचे नियमन करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. कोणत्याही अभ्यासक्रमात कालानुरूप बदल करणे समजू शकतो पण म्हणून मात्र कोणतेही वर्तमान अभ्यासक्रम अचानक बंद करणे हा याचा अर्थ असू शकत नाही व तसा काही प्रस्तावही नाही, अशी पुस्तीही जावडेकरांनी जोडली आहे. निकालाच्या दिवसात अशी खोटी बातमी खाजगी शिक्षण लॉबीने मुद्दाम पेरली असावी, अशीही शंका घेतली जात आहे. पंढरीच्या वारीत सारेच वारकरी कसे साधेभोळे, सरळमार्गी. मात्र, शिक्षणाच्या वारीचं मात्र तसं नाही. येथे सर्वच प्रकारचे लोक असतात. त्यामुळे असे प्रकार नेहमीच घडत असतात. असं असलं तरी या वारीचे पावित्र्य तितकेच आहे. विशेष म्हणजे शिक्षणाचे महत्व आपल्या संतांनिही मान्य केले आहे. काही धक्कादायक, अप्रिय घटना येथे घडतात, त्याचे प्रमाण खुप कमी आहे. सध्या तर शिक्षणाच्या वारीतील वारकरी म्हणजेच विद्यार्थ्यांनी कमालच केली आहे. ते दहावीच्या निकालांनतर आपण सर्वांनीच पाहिले. 193 विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण मिळणे हे खरंच आपल्या राज्याला अभिमानास्पद आहे. शिक्षण व्यवस्थेला दोष देत बसण्यापेक्षा अशा उर्जा देणार्या बाबी आपण नजरेआड करून चालणार नाहीत. आपल्या शिक्षणाचा दर्जा चांगलाच आहे. फक्त शिक्षणाच्या वारीतील पालखीचे भोई चांगले हवेत. बस एवढीच अपेक्षा. काही दिवसांपूर्वी तर आपल्या राज्याच्या शिक्षण मंत्र्यांच्याच पदवीवर काहींनी संशय घेतला होता. आता तो धुरळा खाली बसला असला तरी शिक्षणाच्या वारीच्यानिमित्ताने त्याची आठवण झाली एवढंच. अशा अरोपांना केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनाही समोरे जावे लागले होते. या जून महिन्यातील शिक्षणाच्या वारीचे वातावरण मात्र खुपच आशादायक आणि नवी उमेद देणारे असेच आहे. आपण त्याचाच अधिक विचार केला पाहिजे. महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी दहावी-बारावीत मिळवलेले यश खरंच राज्याच्या प्रगतीचे सुचिन्ह आहे. राज्याची शिक्षणाची ही वारी सध्यातरी चांगल्या मार्गावर आहे. हे ही नसे थोडके.
अजय सोनावणे – सहसंपादक, जनशक्ति, पुणे.