शिक्षणातून वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्याची गरज

शिंदखेडा येथील शिक्षिका प्रशिक्षणातील मान्यवरांचे प्रतिपादन

शिदखेडा(प्रतिनिधी) : शिक्षण विभाग, पंचायत समिती, शिंदखेडा व महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शिंदखेडा शाखेच्यावतीने तालुक्यातील माध्यमिक शिक्षकांसाठी वैज्ञानिक जाणिवा शिक्षक प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. यातील पहिल्या टप्प्यात महिला शिक्षिकांचे प्रशिक्षण काल दि. ११सप्टेंबर रोजी येथील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पतसंस्थेच्या शहिद डॉ. नरेंद्र दाभोलकर सभागृहात पार पडले. सकाळी पाण्यावर दिवा पेटवून आगळ्यावेगळ्या पद्धतीने कार्यशाळेचे उद्घाटन झाले. उद्घाटक म्हणून तालुका पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी डॉ. सी.के.पाटील उपस्थित होते. अध्यक्षस्थानी राज्य कार्यवाह सुरेश बोरसे होते. प्रमुख पाहुणे शिक्षण विस्तार अधिकारी चुडामण बोरसे हे होते. आपल्या मनोगतात डॉ. सी. के. पाटील सांगितले की, चांद्रयानामुळे संपूर्ण जगात आपल्या देशाचा लौकिक वाढला आहे. त्या पाठोपाठ आपले आदित्य हे सौरयान देखील झेपावले आहे. मात्र दुसरीकडे आपण अजूनही अंधश्रद्धांमध्ये गुरफटलेले आहोत. आपल्याला श्रध्दा आणि अंधश्रद्धेत फरक करता आला पाहिजे. त्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोन महत्त्वाचा आहे. म्हणूनच वैज्ञानिक दृष्टिकोन हे शिक्षणाच्या गाभा घटकातील महत्त्वाचे मूल्य असून मूल्य शिक्षणात देखील त्याचा अंतर्भाव आहे.

या प्रशिक्षण कार्यशाळेत ” वैज्ञानिक दृष्टिकोन आणि शिक्षकांची भूमिका” या विषयावर प्रा. दिपक माळी व प्रा.संदीप गिरासे, “स्रीया आणि अंधश्रद्धा निर्मूलन” या विषयावर प्रा. परेश शाह व प्रा.संदीप गिरासे, “चमत्कार आणि विज्ञान” या विषयावर म.अंनिसच्या प्रशिक्षण विभागाचे राज्य कार्यवाह सुरेश बोरसे, शिरपूर व भिका पाटील तसेच “जादुटोणा विरोधी कायदा” या विषयावर सुरेश बोरसे यांनी मार्गदर्शन केले. सर्व विषय अत्यंत संवादी पध्दतीने घेण्यात आले व शंका समाधान करण्यात आले.

कार्यशाळेच्या समारोप प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून शिंदखेडा तहसीलदार ज्ञानेश्वर सपकाळे व अशोकभाई शाह उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करतांना तहसीलदार सपकाळे यांनी तथागत गौतम बुध्द, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदी महापुरुषांचे दाखले देत अंधश्रद्धांचे मूळ अज्ञानात आहे. त्यामुळे आपण ज्ञान आणि विज्ञानाच्या सहाय्याने अज्ञान व अंधश्रद्धा घालविण्यासाठी काम केले पाहिजे. चिकित्सक वृत्तीने कोणत्याही घटनेचा कार्यकारणभाव तपासणारे विद्यार्थी घडविण्याचे आवाहन त्यांनी या प्रसंगी केले. अशोकभाई शाह व दर्शना पवार यांनी देखील शिबिरार्थी महिलांना मार्गदर्शन केले. यावेळी शिबिरार्थी महिलांनी उत्स्फूर्तपणे मनोगत व्यक्त केले. सर्वांनीच कार्यशाळा अत्यंत उपयुक्त असून उत्कृष्ट संजोजनाबद्दल अभिप्राय नोंदविले. शिबिरात तालुक्यातील जवळपास पन्नास शिक्षिका सकाळी ११ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत उपस्थित होत्या. राधा देसले यांनी आभार प्रदर्शन केले.

या शिबिरातसाठी शिंदखेडा तालुका विज्ञान व गणित अध्यापक मंडळ, महाराष्ट्र अंनिसचे राज्य कार्यवाह सुरेश बोरसे व प्रा. परेश शाह, शाखा कार्याध्यक्ष प्रा.दिपक माळी, प्रधान सचिव भिका पाटील, शिबीर संयोजक प्रा. संदीप गिरासे, देवेंद्र नाईक, प्रा. अनिरुद्ध महानोर, प्रा. भिमराव कढरे, ऐश्वर्या लोहार,

पतसंस्थेचे सर्व कर्मचारी दिपक तावडे, जयपाल गीरासे व योगेश गिरासे भूपेंद्र लोहार यांनी परिश्रम घेतले.