शिक्षणाने बुद्धांऐवजी निर्बुद्ध निर्माण होत आहेत

0

पिंपरी-चिंचवड : शिक्षणाने ’बुद्ध’ निर्माण होण्याऐवजी ’निर्बुद्ध’ निर्माण होत आहेत, त्यामुळे प्रचलित शिक्षणपद्धतीला पर्याय देण्याची नितांत आवश्यकता आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक आणि सामाजिक कार्यकर्ते गिरीश प्रभुणे यांनीकेले. समरसता साहित्य परिषद, सामाजिक समरसता मंच आणि समरसता गतीविधी या संस्थांच्या वतीने चिंचवड मधील भारतमाता भवन येथे सन्मान सोहळा झाला. त्यामध्ये प्रभुणे बोलत होते. 9 व 10 डिसेंबरला अहमदनगर येथे होणार्‍या ‘भटक्या विमुक्तांचे साहित्य आणि समरसता’ या विषयावरील अठराव्या समरसता साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी गिरीश प्रभुणे यांची निवड झाली आहे.

रवींद्र गुर्जर यांच्या हस्ते सत्कार
या निवडीचे औचित्य साधून बडोदा येथे होणार्‍या 91 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अध्यक्षपदाचे उमेदवार आणि ज्येष्ठ साहित्यिक रवींद्र गुर्जर यांच्या हस्ते प्रभुणे यांचा विशेष सन्मान करण्यात आला. समरसता साहित्य परिषद, पिंपरी-चिंचवड शाखाध्यक्ष रमेश वाकनीस यांनी आपल्या प्रास्ताविकातून गिरीश प्रभुणे यांची साहित्य आणि समाजकार्यातील जडणघडण विस्तृतपणे मांडली. या प्रसंगी ’किनारा’ वृद्धाश्रमाच्या संचालिका प्रीती वैद्य, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विलास लांडगे, चंद्रशेखर जोशी, शोभा जोशी, ’स्नेहवन’चे अशोक देशमाने, मधू जोशी, प्रा.बी.आर. माडगूळकर, प्रा. तुकाराम पाटील, माधुरी ओक, राज अहेरराव आणि नंदकुमार मुरडे आदी उपस्थित होते.

सेवाभावी संस्थांची गुंफण हवी
गुर्जर म्हणाले, सातत्याने चाळीस वर्षे एकच ध्यास घेऊन सामाजिक कार्य करणे ही खूप अवघड अन् कौतुकास्पद बाब आहे. मनाचे रोग दूर करण्यासाठी माणसाने समाजाशी समरस झाले पाहिजे. सेवाभावी कामे करणार्‍या अनेक संस्था आहेत; परंतु त्या विखुरलेल्या आहेत. आधुनिक प्रसारमाध्यमांचा वापर करून सत्कार्य करणार्‍या या संस्था एकमेकांशी जोडल्या गेल्यास अतिशय प्रभावीपणे आपले उद्दिष्ट साध्य करू शकतील.

केवळ पदव्याच मिळतात
प्रभुणे म्हणाले, भारतीयांची सांस्कृतिक मुळे नष्ट करण्यासाठी 1931 मध्ये ब्रिटिश शिक्षणतज्ज्ञ मेकॉले आणि लॉर्ड बेटिंग यांनी ब्रिटिश संसदेत एक शिक्षणपद्धती मंजूर करवून घेतली. या शिक्षणपद्धतीचा उद्देश भारतात ’काळे इंग्रज’ निर्माण करणे एवढाच होता. त्यामुळे प्रचलित शिक्षणपद्धतीने पदव्या मिळतात; पण ज्ञान मिळतेच असे नाही. ज्यांना आपण भटके, विमुक्त म्हणतो त्यांचे निसर्गाचे आकलन, अंगभूत कला-कौशल्य आणि व्यावहारिक ज्ञान खूप समृद्ध आहे, याचा प्रत्यय त्यांच्या सान्निध्यात राहिल्याने आला.
बाळासाहेब सुबंध, मानसी चिटणीस, समृद्धी सुर्वे, कैलास बहिरट, संतोष गुरव, रमेश कुंभार, रमेश टेकाडे, प्रदीप गांधलीकर यांनी संयोजनात सहकार्य केले. सुहास घुमरे यांनी सूत्रसंचालन केले. उज्ज्वला केळकर यांनी आभार मानले.