जळगाव। जीवनात आनंद नसेल तर त्या शिक्षणाला अर्थ नाही. पालकांनी पाल्याची केवळ काळजी न करता त्याला स्वावलंबी व स्वयंपूर्ण बनविणे गरजेचे आहे, असे दीपस्तंभ फाऊंडेशनचे संस्थापक यजुर्वेंद महाजन यांनी प्रतिपादन केले. रोटरी क्लब ऑफ जळगाव वेस्ट तर्फे मायादेवी नगरातील रोटरी भवन येथे गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. व्यासपीठावर अध्यक्ष ऍड.सुरज जहाँगीर, मानद सचिव कृष्णकुमार वाणी यांची उपस्थिती होती.
पाल्याची इतरांशी तुलना करू नका
आपल्या मुलांना आपण शिक्षण का देतो? असा प्रश्न विचारत प्रा.यजुर्वेद महाजन यांनी व्याख्यानाला प्रारंभ केला. खुप गुण मिळविणे, ठराविक क्षेत्रातील अभ्यासक्रमांसाठी चांगल्या महाविद्यालय प्रवेश मिळवणे नंतर सुरक्षित क्षेत्रात कमी कष्टात, कमी वेळेत अधिक पैसा मिळविणे ही पालकांची पाल्यांकडून अपेक्षा झालेली आहे. दुर्देवाने या जीवघेण्या स्पर्धेत मुलाचं बालपण हिरावलं जात आहे. त्यांच्या भावनिक, शारिरीक आणि सामाजिक बाबींच्या विकासाकडे दुर्लक्ष होत असल्याची खंत महाजन यांनी व्यक्त केली. इंग्रजी भाषा ही प्रगतीचे माध्यम आहे. पण इंग्रजी बोलणे म्हणजे प्रगती नाही. पाल्याची इतरांशी तुलना करू नका. तुलना केल्याने समाधान न मिळता माणूस दु:खी होतो. त्यामुळे पाल्यांची काळजी किंवा भविष्याची चिंता न करता त्याला स्वावलंबी व स्वयंपूर्ण करा असे आवाहन यजुर्वेद महाजन यांनी केले. यावेळी दिपस्तंभच्या मनोबल केंद्रातील लक्ष्मी शिंदे (सोलापूर) या विद्यार्थीनीने मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमात रोटरी वेस्ट सदस्यांच्या 83 पाल्यांचा महाजन यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. परिचय डॉ.सीमा पाटील यांनी तर आभार दीपा कक्कड यांनी मानले. सूत्र संचालन स्नेहल काबरा व काजल सुखवाणी यांनी केले. यशस्वीतेसाठी योगेश राका, सुनील सुखवाणी, अनुप असावा, सुप्रित दिक्षीत, रमन जाजू, विवेक काबरा आदिंसह रोटरी वेस्टच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.