हडपसर । महापालिकांच्या शाळांमध्ये शिक्षक नाहीत; अपुर्या सुविधांमुळे विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले आहे. महापालिका आयुक्त व शिक्षण अधिकारी यांच्याकडे वारंवार मागणी करूनही आश्वासने देऊन फसवणूक केली जात आहे. महापालिका शाळांच्या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी शिक्षण अधिकारी कार्यालयास टाळे ठोकून आंदोलन करण्याचा इशारा नगरसेवक योगेश ससाणे यांनी दिला आहे. याबाबतचे निवेदन नगरसेवक योगेश ससाणे, भैय्यासाहेब जाधव, महेंद्र पठारे यांनी दिले आहे.
शहरातील महापालिकेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार शिक्षक शिकविण्यासाठी उपलब्ध नाहीत, शाळेत बेंच नसल्यामुळे विद्यार्थी खाली बसतात, शाळेत मुख्याध्यापक, शिपाई, स्वच्छता सेवक, रखवालदार नाहीत त्यामुळे शाळेची स्वच्छता वेळेवर होत नाही. स्वच्छतागृहांची अवस्था खराब असल्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण झाला आहे. याबाबत आंदोलने करूनही जर प्रशासन लक्ष देत नसेल, तर निर्ढावलेल्या प्रशासनाला त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून द्यावी लागेल. विद्यार्थ्यांचे भवितव्य लक्षात घेऊन अधिकार्यांनी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी नगरसेवकांनी केली आहे.
प्रशासनाचे दुर्लक्ष
पालिका शाळांकडे प्रशासन जाणूनबुजून दुर्लक्ष करत आहे, शाळेत शिक्षक नसल्याने विद्यार्थी बाहेर फिरतात, याबाबत पालिका अधिकारी व आयुक्तांना लेखी निवेदने दिली. 1 ऑगस्टपासून सुरळीत होईल, असे आयुक्तांनी सांगितले होते. आणि प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शिक्षण अधिकारी यांच्या कार्यालयाला टाळे ठोकून काम बंद आंदोलन करणार आहे. तरीही प्रशासनाने दखल घेतली नाही तर महापालिकेत तीव्र आंदोलन केले जाईल.
– योगेश ससाणे, प्रभाग समिती अध्यक्ष, नगरसेवक