शिक्षण उपसंचालकाच्या त्रासाला कंटाळून शिक्षकाचा आत्महत्येचा प्रयत्न

शालार्थची फाईल मंजुरीला विलंब करत वेगवेगळ्या कारणांनी त्रास : खाजगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरु

भुसावळ : शालार्थच्या फाईलवर चार महिने उलटूनही शिक्षण उपसंचालक स्वाक्षरी करुन मंजुरी देत नाहीये. या शालार्थची फाईल प्रलंबित असल्यामुळे काम करूनही संस्थेकडून त्याचा मोबदला मिळत नाहीये. सर्व कागदपत्रांची पूर्तता करुनही शिक्षण उपसंचालकांकडून फाईल मंजुर न करता त्रास दिला जात असल्याने या छळाला कंटाळून जामनेर तालुक्यातील एकलव्य विद्यालयात नोकरी असलेल्या भारत बाबूलाल रेशवाल शिक्षकाने 1 रोजी विषारी पदार्थ खावून आत्महत्येचा प्रयत्न केला. वेळीच प्रकार लक्षात आल्याने कुटुंबियांनी त्यांना भुसावळातील रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. दरम्यान, कागदपत्रांची पूर्तता करुनही शिक्षण उपसंचालक नितीन उपासनी यांच्याकडून रेशवाल यांची फाईल कोणत्या कारणाने अडविण्यात आली आहे? यामागे नेमका त्यांचा उद्देश काय, शिक्षकाचा जीव गेल्यावर उपसंचालक फाईलवर स्वाक्षरी करतील काय? असाही प्रश्‍नही आता उपस्थित होत आहेत. शिक्षकाने आत्महत्येचा प्रयत्न केल्यानंतर भुसावळातील बाजारपेठ पोलिसांनी शिक्षकाचा जवाब नोंदवला आहे.

शिक्षण उपसंचालक नितीन उपासनी यांच्याकडे प्रस्ताव पडून
भारत रेशवाल यांची पत्नी अंकिता रेशवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार असे की, जामनेर येथील एकलव्य शिक्षण संस्था व संस्थेत कार्यरत शिक्षक भारत बाबुलाल रेशवाल यांच्या वाद होता त्यामुळे रेशवाल यांना शाळेतून काढून टाकण्यात आले होते. तब्बल सात वर्ष कायदेशीर लढा दिल्यानंतर रेशवाल यांना न्याय मिळाला. उच्च न्यायालयाने रेशवाल यांना शाळेत पुन्हा रुजू करुन घेण्याचे आदेश दिले. त्यानुसार 11 नोव्हेंबर 2020 रोजी भारत रेशवाल पुन्हा शिक्षक म्हणून एकलव्य शिक्षण संस्थेत रुजू झाले. रूजू झाल्यानंतर शालार्थ संबंधित सर्व कागदपत्रांची पूर्तता करत रेशवाल यांनी स्वतः प्रस्ताव शिक्षण उपसंचालक नितीन उपासनी यांच्याकडे जमा केला.

तब्बल चार महिन्यांपासूनच फाईल पडून
तब्बल चार महिन्यांपासून ही फाईल शिक्षण उपसंचालक उपासनी यांच्याकडे पडून आहे. इतर फाईलवर उपासनी यांनी मंजूरी दिली मात्र रेशवाल यांच्या फाईल अडकवून ठेवली आहे. फाईल प्रलंबित असल्याने रेशवाल यांना नोव्हेंबरपासून संस्थेकडून वेतनापोटीचा एक रुपयाही मिळालेला नाही. कुटुंबाचा उदरनिर्वाह भागविण्यात रेशवाल यांना असंख्य अडचणींचा सामना करावा लागत आहे. सर्व कागदपत्रांची पूर्तता करुन शिक्षण उपसंचालक उपासनी यांच्याकडून त्रास दिला जात असून कुठलाही निर्णय घेण्यात आलेला नाही. यासाठी उपासनी यांच्याकडून पैशांची मागणी करण्यात आल्याचा आरोप अंकिता रेशवाल यांनी केला आहे.
संस्थेकडून पगार होत नसल्याने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा जबाब भारत रीचवाल यांनी बाजारपेठ पोलिसांना दिला आहे.

संस्था व शिक्षकांचा वाद
संस्था आणि शिक्षकांचा वाद आहे. बॅक डेटच्या डिफरन्सचा विषय आहे. याबाबतचा प्रस्ताव शिक्षक रीचवाल यांनी आपल्याकडे दिला आहे. याबाबतच्या सुनावणीत संस्था व शिक्षक समोर हजर राहिल्यास फाईलवर निर्णय घेता येईल याबाबतच्या सुनावणीसाठी शिक्षकाने अर्ज करावा, असे शिक्षण उपसंचालक नितीन उपासनी म्हणाले.