शिक्षण पंढरीचे वारकरी : बाबासाहेब के. नारखेडे

0

आज २१ सप्टेंबर. खान्देशातील साहित्यिक कै. बाबासाहेब के. नारखेडे यांचा स्मृतीदिन. बाबासाहेब के. नारखेडे म्हणजेच कौतिक गरबड नारखेडे. मांगल्य, भक्ती, त्याग, वात्सल्य या उदात्त जीवन मूल्यांशी नांत सांगणारं ‘नाव’! माणुसकीचे पाते शिकविणारा समर्पित व्यक्तीमत्त्वाचा एक चिरनुतन ग्रंथच! खान्देशातील सातपुड्याच्या पायथ्याशी डोंगरकठोरे या गावी २६ ऑक्टोंबर १९०० रोजी निष्ठेचा ठसा नि कष्टाचा वसा स्विकारलेल्या शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. बालपणापासून चांगले मित्र जोडले, शिक्षणात रस घेतला, शेतीत काम करण्याची आवड होती. १९१८ ते १९२१ या काळात त्यांनी धुळे येथे शिक्षक प्रशिक्षण घेतलं, लेखनकार्याची मुहूर्तमेढ याच काळात रोवली गेली. ट्रेनिंग कॉलेजात लेखनकला, वक्तृत्वकलेचे धडे गिरवले . मुद्देसूद, स्पष्ट आणि रेखीवपणे लिहिण्या -बोलण्याचं कसब त्यांनी हस्तगत केलं, ही शिदोरी आयुष्यभर पुरली.बाबा शिक्षक झाले, जीवनाची एक विशिष्ट चाकोरी आखली गेली. किनगाव, नांदेड, पाडळसे अशा ठिकाणी नोकरी निमित्ताने भ्रमंती झाली, लेखन, वाचन, मनन, चिंतन सुरुच होतं. अभ्यासही सुरु होता.

१९२७ मध्ये ते मॅट्रिकला पहिले आले. त्यांना शिष्यवृत्ती मिळाली. १९२८ साली भुसावळच्या डी.एस.हायस्कूलमध्ये त्यांनी माध्यमिक शिक्षकाची नोकरी पत्करली. या पेशात त्यांनी स्वत:ला झोकून दिलं. अध्ययन आणि अध्यापन या आनंददायी ज्ञानयात्रेचे ते वारकरीच, भुसावळला ‘बलभीम’ व्यायामशाळा सुरु केली. बाबांचं पहिलं पुस्तक ‘यशोगीत’ त्यानंतर ‘चंद्रकला’ आणि ‘शिवार’ हे कवितासंग्रह ‘चिव-चिव’ आणि ‘गोडगाणी’े बालगीत संग्रहाला वाचकांनी उत्तम प्रतिसाद दिला. ‘मधुराणी’ ‘आजच्या गोष्टी भाग १ ते ३’ ‘वेडा राजपुत्र’‘मोत्याचा मळा’ ‘तारकापुष्प’ ‘राधेय’ हीसुद्धा त्यांची गाजलेली पुस्तकं. १९५० नंतरच्या मराठी ग्रामीण साहित्यातील ‘अंजनी’ ही एक वैशिष्ट्यपूर्ण कादंबरी आहे. ‘सोनेरी पाने’ ‘जलवंती’ ‘आनंदवन’ या कादंबर्‍या राज्य सरकारच्या पुरस्कारास पात्र ठरल्या ‘काव्य कलेेचे अंतरंग’ हे बाबांचे साहित्य समिक्षेवरील पुस्तक.

बाबांनी दीर्घकाळ शिक्षकी पेशात घालविल्यानं एका आदर्श शाळेची संकल्पना त्यांच्या मनात होती. भुसावळच्या कै.रामभाऊ हंबर्डीकर, कै.घनश्याम काशीराम पाटील या मित्रांच्या सहाय्याने १९६० साली त्यांनी ‘श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना केली.’ भुसावळ येथे आपली शाळा नावानं प्राथमिक शाळा सुरु केली. पुढे तु.स.झोपे गुरुजी प्राथमिक विद्या मंदिर असे नाव देण्यात आले. १९६८ सालच्या या लहान ओहळाचं रुपांतर एका विशाल सरितेत झालं. प्राथमिक शाळेनंतर आपले विद्यालय या नावानं हायस्कूल सुरु झालं. संस्थेने बाबासाहेबांचं कुशल नेतृत्व मान्य करुन विद्यालयाचं ‘के.नारखेडे विद्यालय’ असे नामाभिधान केलं! आज शिशुवर्ग ते महाविद्यालयापर्यंत विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. संस्था स्थापनेपासून आजतागायत विद्यालयाचे एस.एस.सी., एच.एस.सी. परीक्षेचे निकाल, स्कॉलरशिप परीक्षेचे निकाल, स्थानिक जिल्हा व राज्यपातळीवर होणार्‍या स्पर्धांमध्ये विद्यार्थी व शिक्षक मिळवित असलेले यश नेत्रदीपक आहे, ध्येयवादी संचालक, गुणी व कष्टाळू विद्यार्थी, विद्यार्थीप्रिय शिक्षक यांच्या उचित मेळातून इथे विद्येचे वातावरण तयार झाले आहे.

बाबासाहेबांच्या पश्‍चात या संस्थेला प्रगतीच्या शिखराकडे नेण्याचे कार्य त्यांचे ुपुत्र दादासाहेब एन.के.नारखेडे व संचालक मंडळ तळमळीने करीत आहे. बाबासाहेब के.नारखेडे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ २१ सप्टेंबर रोजी भुसावळ येथे राज्यस्तरावर विद्यार्थी व शिक्षकांमधून लेखक, कवी, वक्ते घडावेत या हेतुने वक्तृत्व, निबंध, लेखन, भावगीत, गायन, कथा, कविता, रांगोळी, बालवैज्ञानिक या स्पर्धा सुरु करण्यात आल्या. बक्षीस वितरणनिमित्त विचारवंतांची व्याख्याने आयोजित केली जातात .

– शब्दांकन
शांताराम जगन्नाथ पाटील,
सानेगुरुजी विचार परिवार, भुसावळ