शिक्षण बचाव पदयात्रा

0

पुणे । गेल्या पाच वर्षापासून शिक्षक भरती बंद आहे. शाळा अनुदानास पात्र असूनही हजारो शिक्षक वेतनापासून वंचित आहेत. या शिक्षकांना न्याय मिळवून देण्यासाठी व शिक्षणाच्या समस्या सोडविण्यासाठी पुण्यातील भिडे वाड्यापासून ते मुंबई येथील शिक्षणमंत्र्यांच्या बंगल्यापर्यंत शिक्षण बचाव पदयात्रा काढण्यात येणार असल्याची माहिती पुणे विभागाचे शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत यांनी दिली. सोमवारी भिडे वाड्यातील शाळेपासून पदयात्रा सुरू होणार असून, ती 23 जुलै रोजी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या मुंबई येथील सेवा सदन बंगल्यावरती पोहोचणार आहे. या पदयात्रेत अमरावती विभागाचे शिक्षक आमदार श्रीकांत देशपांडे व शिक्षक सेनेचे प्रदेशाध्यक्ष ज. मा. अभ्यंकर सहभागी होणार आहेत. या पदयात्रेत हजारो शिक्षक सहभागी होणार असल्याचे सावंत यांनी सांगितले.