शिक्षण मंडळाकडून 40 हजारांची पुस्तक खरेदी

0

21 लाखांचा खर्चासाठी स्थायीसमोर प्रस्ताव

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका शिक्षण मंडळातर्फे येत्या शैक्षणिक वर्षासाठी इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांकरिता 21 लाख, 80 हजार, 436 रुपयांची 39 हजार 948 क्रमिक पाठ्यपुस्तके बालभारतीकडून थेट पद्धतीने खरेदी केली जाणार आहेत. 21 लाखांचा खर्च असलेला हा प्रस्ताव हा पुस्तक खरेदीचा स्थायी समितीच्या मान्यतेकरिता ठेवण्यात आला आहे.

खरेदीचा अधिकार आयुक्तांना
पिंपरी-चिंचवड महापालिकेचे शिक्षण मंडळ बरखास्त झाल्यानंतरही विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, याकरिता खरेदीचे सर्व अधिकार महापालिका आयुक्तांना देण्यात आले आहेत. शिक्षण मंडळाच्या बरखास्तीनंतर अद्यापही शालेय शिक्षण समिती अस्तित्वात येऊ शकलेले नाही. ही बाब लक्षात घेत, शैक्षणिक वर्ष सुरु होत असताना विद्यार्थ्यांना कोणतीही अडचण भासू नये, याकरिता हा निर्णय घेण्यात आला आहे. याअंतर्गत मराठी, इंग्रजी व उर्दु माध्यमासाठी ही पुस्तक खरेदी केली जाणार आहेत.

बिस्किटांसाठी 1 लाखाचा खर्च
दरम्यान, शिक्षण समिती अस्तित्वात नसल्याने प्रजासत्ताक दिनी महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना वाटप केल्या गेलेल्या बिस्कीट पुडा व पाण्याची बाटली खरेदीसाठी एकूण एक लाख दहा हजार रुपये खर्चास स्थायी समितीची मान्यता घेतली जाणार आहे. याअंतर्गत 26 जानेवारी 2018 रोजी भक्ति-शक्ति चौकात देशातील सर्वात मोठ्या उंचीच्या ध्वजाचे उद्घाटन व ध्वजारोहणाच्या दिवशी विद्यार्थ्यांना बिस्कीट पुडे व पाण्याच्या बाटल्या वाटप करण्यात आल्या. याकरिता 27 हजार रुपये खर्च अला. तसेच याच दिवशी महापालिकेच्या मोरवाडी व कासारवाडी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांना 82 हजार रुपये खर्चाचा प्रस्ताव स्थायीच्या मान्यतेसाठी ठेवण्यात आला आहे.