शिक्षण विभागाचा अजब कारभार, दोन ड्रेससाठी चारशे रुपये

0

जळगाव। जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेंतर्गत येणार्‍या शासकीय शाळेतील विद्यार्थ्यांना दरवर्षी मोफत गणवेशाचे वाटप करण्यात येत होते. गणवेश वाटपात घोळ होत असल्याचे निदर्शनात आल्यानंतर शालेय शिक्षण विभागाने गणवेशाचे वाटप न करता विद्यार्थ्यांच्या खात्यात थेट गणवेशाचे रक्कम टाकण्याचा निर्णय घेतला आहे. यावर्षापासून विद्यार्थ्यांच्या खात्यात रक्कम जमा करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांच्या खात्यात प्रति गणवेश दोनशे रुपये प्रमाणे दोन गणवेशाचे चारशे रुपये रक्कम जमा करण्यात येणार आहे. मात्र आजच्या महागाईच्या काळात दोनशे रुपयात एक ड्रेस मिळणे शक्य नसून शिक्षण विभागाचा अजब गजब कारभाराचा पालकांना आर्थिक भुर्दंड बसणार आहे. साधारण दोन आयत्या ड्रेसची किंमत 600-800 रुपये आहे. तर चांगल्या प्रतीचे कापड विकत घेऊन शिलाई सहीत दोन ड्रेस हजार रुपयापर्यत जाणार असल्याने पालकांवर आर्थिक ताण येणार आहे.

शाळांच्या खात्यात रक्कम वर्ग
15 जून नंतर शाळा सुरु होणार आहे. जिल्हा परिषद शिक्षण विभागातर्फे जिल्ह्यातील सर्व शाळांच्या बँक खात्यात पैसे वर्ग करण्यात येत आहे. येत्या आठवड्याभरात ही रक्कम सर्व शाळांच्या खात्यात जमा होणार असल्याचे शिक्षण विभागाने सांगितले. शाळेकडून बिल जमा केल्यानंतर विद्यार्थ्यांच्या खात्यात रक्कम जमा केली जाणार आहे. हा एकदा उघड झाला आहे.

आधी बिल नंतर पैसे
पालकांना स्वःखर्चाने पाल्यांसाठी दोन गणवेश खरेदी करावे लागणार आहे. शाळा सुरु होण्याअगोदर गणवेश खरेदी करणे आहे. अगोदर स्वःखर्चाने गणवेश खरेदी करावयाचे असून खरेदीचे बिल हे शाळेच्या मुख्याध्यपकांकडे जमा केल्या नंतर शाळेतर्फे लाभार्थी विद्यार्थ्यांच्या खात्यात रक्कम जमा करण्यात येणार आहे. गणवेशाची किंमत जरी जास्त असेल तरी केवळ चारशे रुपयेच खात्यात जमा केले जाईल.

6 कोटी रुपये
1 ली ते 8 वीच्या विद्यार्थ्यांना गणवेशाचे रक्कम देण्यात येते. 1 हजार 892 शाळांना 6 कोटी 38 लाख 47 हजार सहाशे रुपयाचा निधी वितरीत केला जाणार आहे. सर्व मुली व अनुसुचित जाती व अनुसुचित जमाती प्रवर्गातील 1 लाख 59 हजार 612 विद्यार्थ्यांना गणवेश खरेदीसाठी पैसे देण्यात येणार आहे. विद्यार्थी व आईच्या नावाचे आधारकार्ड संलग्न बँकेत संयुक्त खाते उघडावयाचे आहे. पोस्टाच्या बचत खात्यात देखील रक्कम जमा होणार आहे.