जळगाव । हेतूपुरस्सर व सतत कर्तव्यात कसूर करणे, शालेय दैनंदिन प्रशासन चालविण्याबाबत अकार्यक्षम असणे, मुख्याध्यापक म्हणून सहायकांच्या कामावर देखरेख व नियंत्रण न ठवेणे, शालेय समितीची सभा न बोलविणे, संस्थेकडे वेळोवेळी हिशोब न सादर करणे, प्रगत शैक्षणिक धोरणांतर्गत शासनाकडून आलेल्या आदेशाची अंमलबजावणी न करणे आदी निलंबनाची कारणे दाखवुन आर.आर.विद्यालयाचे संस्थाचालक अरविंद लाठी यांनी मुख्याध्यापक डी.एस.सरोदे यांना निलंबन केले. एखाद्या मुख्याध्यापकाला निलंबकीत करतांना शिक्षण विभागाचे आदेश घेणे आवश्यक होते. मात्र शिक्षण विभागाचे कोणतेही आदेश नसतांना सरोदे यांना निलंबीत करण्यात आले आहे. सरोदे यांचे निलंबन मागे घेण्यात यावे अशी मागणी अखिल भारतीय लेवा पाटीदार युवक महासंघातर्फे करण्यात आली आहे.
निवेदन देतेवेळी यांची होती उपस्थिती
मागणीचे निवेदन जिल्हा परिषद अध्यक्ष उज्ज्वला पाटील, सीईओ कौस्तुभ दिवेगावकर, सभापती पोपट भोळे यांना देण्यात आले. यावेळी भुसावळ नगरसेवक चंद्रशेखर अत्तरदे, पंचायत समिती सदस्य मिलींद चौधरी, पंचायत समिती सदस्य पुरुजित चौधरी, बंडू भोळे, प्रदीप भोळे, किशोर चौधरी, अॅड.प्रकाश पाटील, संजय ढाके आदी उपस्थित होते.
मुख्य प्रकरण
आर.आर. विद्यालयातील मुख्याध्यापकांसह 68 शिक्षकांनी संस्थाध्यक्ष अरविंद लाठी यांच्याकडून मानसिक छळ होत असल्याचा आरोप केला होता. याप्रकरणी शाळेतील शिक्षक व मुख्याध्यापकांनी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याकडे निवेदन दिले होते. त्यांनीदेखील या प्रकरणी चौकशीचे आदेश आहेत. शिक्षण विद्यालयातील मुख्यापकांसह 68 शिक्षकांचे जबाब नोंदवून घेतले होते. तसेच हा अहवाल शिक्षणाधिकार्यांनी शिक्षक संचालकांकडे पाठविला आहे. या घटनेचा सुड घेण्यासाठी संस्थाचालकाने निलंबन केल्याचे आरोप निवेदनात करण्यात आले आहे.
माजी विद्यार्थ्यांचे निर्दशने
मुख्याध्यापक डी.एस.सरोदे यांना निलंबीत करण्यात आल्याच्या निषेधार्थ आर.आर.विद्यालयाचे माजी विद्यार्थी विद्यालयासमोर मंगळवारी 11 रोजी निदर्शने करणार आहे. त्वरीत निलंबन मागे घेण्यात यावे अशी मागणी विद्यार्थ्यांनी केले आहे. तसेच मुख्याध्यापकाच्या समर्थनार्थ संस्थेचे शिक्षक सामुहिक राजीनामा देणार असल्याची माहिती खात्रीलायक सुत्राकडून मिळाली आहे. तसेच आगामी पावसाळी अधिवेशनात विधानसभेत लक्षवेधी मांडण्याचा इशारा देण्यात आला आहे.